नाशिक : मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-ए-मिलाद सण व हिंदू बांधवांची कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी म्हणजे रविवार (दि.9) रोजी साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दुधाचे भाव प्रतिलिटर 100 रुपयांवर पोहोचले होते. मुस्लिम बांधव ईद-ए-मिलादच्या दिवशी सकाळी दूधाची खीर व पुरीसह इतर गोड पदार्थांवर फातेहा पठण करतात. तर पौर्णिमेलादेखील दुधाच्या मागणीत मोठे वाढ होते. यंदा हे दोन्ही सण एक दिवशी आल्याने दुधाच्या दराला महागाईची उकळी फुटली होती. त्यामुळे रविवारी काही ठिकाणी 85 तर, काही ठिकाणी 100 रुपये लिटरने दुधाची विक्री झाली. सकाळीदेखील भाव जास्त राहणार असल्याचा अंदाज व्यापार्यांनी व्यक्त केला आहे. कोजागिरीनिमित्त दूध बाजारपेठेसह उपनगरातील दूग्ध व्यावसायिकांनी दुधाची जादा मागणी नोंदवली होती.
अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी (दि. 9) रात्री चंद्राच्या प्रकाशात खीर किंवा मसाला दूध ठेवत ही पौर्णिमा साजरी करण्यात आली. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृतवृष्टी होते म्हणून खीर बनवून चंद्राच्या थंड प्रकाशात काही तास ठेवावी आणि नंतर तिचे सेवन करावे. असे मानले जाते की, शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने महारस केले. भगवान श्रीकृष्णाने बासरी वाजवून गोपिकांना आपल्याकडे बोलावले आणि त्यांना अमृत पाजले. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्रीचे विशेष महत्त्व आहे. या रात्री, चंद्राच्या 16 कलांसह, चंद्र पृथ्वीवर शीतलता, पौष्टिक शक्ती आणि शांततेचा अमृत वर्षाव करतो.
नाशिक शहरात सुमारे 21 लाख नागरिक राहतात. त्यातील किमान 25 टक्के लोकांनी कोजागिरी साजरी केली. त्यामुळे साधारणत: 3 लाख लोकांनी दूध रिचवले. कोजागिरीनिमित्त ठिकठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मध्यरात्री चंद्राचे पूजन करत आटवलेले दूध पिण्याचा सामूहिक आनंद नाशिककरांनी घेतला. कोरोनानंतरचे वर्षे असल्यामुळे सर्वांना एकत्र येण्याचा दुर्मिळ योग साधता आला.