घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकिल्ले मुल्हेरवर ३५० वर्षांनंतर दुर्गार्पण सोहळा

किल्ले मुल्हेरवर ३५० वर्षांनंतर दुर्गार्पण सोहळा

Subscribe

सटाणा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले मुल्हेरवर सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागामार्फत सिवप्रसाद व रामप्रसाद या तोफांच्या तोफगाड्यांचा दुर्गार्पण सोहळा प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. किल्ल्यावर भंडारा उधळून तोफगाडे दुर्गार्पण करण्यात आले.

यावेळी दुर्गसेवक-दुर्गसेविकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सदरील तोफा अनेक वर्षांपासून जंगलात अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेल्या होत्या, ज्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या २०० दुर्गसेवकांनी ६ मार्च रोजी सलग १२ तास श्रमदान मोहीम घेऊन गडावरील सोमेश्वर मंदिराजवळ स्थानापन्न केल्या होत्या. सह्याद्रीचे दुर्गसेवक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सदरील तोफांना सह्याद्री प्रतिष्ठान शिरुर विभागाच्या मदतीने सागवानी तोफगाडे बनवले. दि. ११ सप्टेंबर रोजी पुन्हा श्रमदान मोहीम घेऊन सदरील तोफा तोफगाड्यांवर विराजमान करण्यात आल्या. सिवप्रसाद व रामप्रसाद ह्या दोन्ही तोफा आता सन्मानाने सागवानी तोफगाड्यांवर विराजमान झाल्या आहेत. त्यांना मान मिळवून देण्यासाठी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी स्थानिकांच्या मदतीने घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.

- Advertisement -

सदरील कार्यक्रमास नाशिक, शिरूर, पुणे, हवेली, अंबरनाथ, चाळीसगाव, सिंधूदुर्ग, इत्यादी ठिकाणांहून दुर्गसेवक उपस्थित होते. कार्यक्रमास पाहुणे म्हणून मुल्हेर गावचे उपसरपंच मोठाभाऊ जगताप, उद्धव महाराज मंदिराचे मठाधिपती किशोर महाराज, प्रदीपआबा बच्छाव, सुनीलआबा गायकवाड, भाऊसाहेब चिला अहिरे, राजेंद्र खैरनार आदी उपस्थित होते. जनता विद्यालयाच्या लेझीम पथकाने व श्रीराम शिवकालीन मर्दानी खेळपथक मालेगाव यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात शिवगारदेने झाली. यावेळी डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित दुर्गसेवकांना व स्थानिकांना लाभले. त्यांनी सांगितले की, सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक गडकिल्ल्यांच्या आज झालेल्या दयनीय अवस्थेवर रडत बसण्यापेक्षा कसे लढतात व त्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देतात. गडकिल्ले म्हणजे शिवरायांच्या व मावळ्यांच्या पराक्रमाची जीवंत स्मारके असून त्यांचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -