घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकालिकेची यात्रा : स्वराज्याच्या चळवळीपासूनची परंपरा

कालिकेची यात्रा : स्वराज्याच्या चळवळीपासूनची परंपरा

Subscribe

नाशिक : गग्रामदैवत म्हणून लौकीक असलेल्या कालिका देवीच्या यात्रोत्सवाच्या अनेक आठवणी जुन्या पिढीने आपल्या मनाच्या कुपीत मोरपिसासारख्या सांभाळून ठेवल्या आहेत. पंचक्रोशीतील गावांतील प्रत्येकाने नवरात्रोत्सवाच्या काळात एकदा तरी या यात्रेचा आनंद लुटावा असा त्यावेळी प्रघात होता. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून नवरात्रात देवीची यात्रा भरू लागली. गावातील मंडळी सीमोल्लंघनासाठी कालिकामाता मंदिरापर्यंत येऊ लागली. तेव्हापासून देवी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येऊ लागले.

नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले ४५ वर्षांपूर्वी कात टाकून नव्या रुपात पदार्पण केलेले कालिकेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान आहे. या देवस्थानाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इ. स. १७०५ च्या सुमारास केला. त्यांनी बांधलेले दगडी मंदिर दहा बाय दहा फूट लांबीचे व पंधरा फूट उंचीचे होते. त्या जवळच एक बारव होती, असे जुनी माणसे सांगतात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून नवरात्रात देवीची यात्रा भरू लागली. त्यावेळी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. मंदिराचा गाभाराही चांदीच्या कलाकुसरयुक्त पत्र्याने सुशोभित करण्यात आला आहे.

- Advertisement -

गाभार्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बालिकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.

बैलगाडीने गाठले जात होते नाशिक

कालिका देवीच्या यात्रेच्याही अनेक आठवणी आहेत. नवरात्रोत्सव काळात या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी हजारो भाविक नाशकात येत. यातील असंख्य ग्रामस्थ हे बैलगाडीने सहकुटुंब नाशिक गाठत. रहाट पाळणे, चक्री, मौत का कुआ, हसरे आरसे आदी बाबी यात्रेकरुंच्या मनोरंजनासाठी सज्ज असायच्या. रबरी पाण्याचा फुगा, रंगबेरंगी पिसांची टोपी, ढुमके आणि कागदाचा बनवलेला राक्षसाचा मुखवटा घेतल्याशिवाय बच्चेकंपनींची यात्रा पूर्ण होत नसायची.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -