हे देवी मंदिर नवरात्रोत्सवातही राहणार बंद

जगदंबा मंदिर दर्शनासाठी बंदच, कोरोनामुळे यात्रोत्सवही रद्

kotamgaon

येवला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा माता यात्रोत्सव रद्द करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार प्रमोद हिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ग्रामपंचायतीने ग्रामसभेत यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री जगदंबा देवस्थान ट्रस्टने तहसीलदार यांचेकडे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना व आदेश मिळण्याबाबत अर्ज केला होता. दरम्यान, तहसीलदार प्रमोद हिले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली असता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव रद्द करण्यात यावा, अशी सूचना पुढे आली होती. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात नाही तर बाहेरून दर्शन होईल अशी अपेक्षा होती परंतु ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता व जवळील जिल्ह्यातील परिस्थिती पाहता ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात येत आहे.

मात्र, मंदिर दर्शनासाठी खुले असणार नाही. मंदिर परिसरात कोणत्याही भाविकास दर्शन वा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जाणार नाही. महामार्गावरच नवरात्रोत्सवाच्या दरम्यान, बॅरिकेटिंग करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे तहसीलदार हिले यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, भाऊसाहेब अदमाने, राजेंद्र कोटमे, आदी उपस्थित होते.