घरनवरात्रौत्सव 2022यात्रेच्या आठवणी : मातीचे बाहुले, कागदाचे कबुतर, लाकडी बस; प्लास्टिकमुळे नामशेष

यात्रेच्या आठवणी : मातीचे बाहुले, कागदाचे कबुतर, लाकडी बस; प्लास्टिकमुळे नामशेष

Subscribe

नाशिक : पूर्वी यात्रा म्हटली की बच्चेकंपनी तिची चातकासारखी वाट बघणार.. रहाट पाळणे, मौत का कुआ, हसरे आरसे, मदार्‍याचा खेळ यांसारखी करमणूक यात्रेत व्हायची खरी; पण यात्रेतून घरी गेल्यावर करमणुकीचे मुख्य साधन कोणते? साधारणत: १९९० च्या दशकापर्यंत तरी माती, कागदाचा लगदा आणि लाकूड यांपासून बनवलेल्या खेळण्या खरेदी केल्याशिवाय यात्रेला जाऊन आल्याची भावनाच निर्माण होत नसे. नाशिकमधील कालिका देवीच्या यात्रेत १९५० च्या आधी हरिभाऊ मोरे व त्यानंतर शंकरराव मोरे यांचे दुकान शोधत यात्रेकरू तेथून खेळण्या खरेदी करायचे. परंतु, प्लास्टिकच्या खेळण्यांचा जसा यात्रेत शिरकाव झाल्यापासून माती, कागद व लाकूड यांपासून बनवलेल्या खेळण्यांचा ‘खेळ खल्लास’ झाला.

पंजाबी, गुजराती, महाराष्ट्रीयन, बंगाली पेहरावातील बाहुला-बाहुलीचे ‘कपल’ आठवते का? साधारणत: १९९० च्या दशकापूर्वी प्रत्येक घरातील शोकेसमध्ये असे एखादे तरी ‘कपल’ दिमाखात स्थानापन्न झालेले दिसायचे. ही खेळणी गावातील यात्रेतून आणलेली असायची. नाशिकमध्ये कालिका मंदिराच्या जवळ सध्या राजमल लखीचंद ज्वेलर्सचे दुकान आहे त्याच परिसरात पूर्वी यात्रेत मोरे बंधुंचा खेळणीचा स्टॉल लागायचा. या स्टॉलला शोधत-शोधत पंचक्रोशीतून ग्राहक यायचे आणि खेळण्यांची खरेदी करायचे. कै. शंकरराव मोरे यांचे चिरंजीव शांताराम मोरे यांनी यासंदर्भातील आठवणींचा पट ‘आपलं महानगर’कडे उलगडला.
सुमारे १९५०-६० पर्यंत काळ्या मातीचीच खेळणी बनवली जायची. ही खेळणी भट्टीत भाजली जात. भट्टीत भाजण्याचे तंत्र मोरे बंधुंनी लखनऊवरुन अवगत केले होते. कालांतराने नदीचा गाळ उपसण्यास मर्यादा आल्याने काळ्या मातीचा तुटवडा भासू लागला. त्यानंतर १९५२ च्या काळात काळ्या मातीबरोबरच शाडू मातीच्या खेळणी बनायला सुरुवात झाली. कमी श्रमात ही खेळणी बनू लागली. याच काळात कागदाच्या लगद्यापासून बनवलेली खेळणी मोरे बंधू तयार करू लागले. त्याला पेपर पॉलची खेळणी म्हटले जात असे. त्याकाळी खेळणी बनवणारे कलाकार यात्रेतच एकमेकांना भेटायचे. एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण व्हायची. त्यातून कागदाच्या खेळण्या नाशकात तयार होऊ लागल्या.

- Advertisement -

लग्नाच्या रुखवतातील खेळणी ही कागदाचीच असायची. त्यात नवरदेव- नवरी, मातीची चूल, भातुकलीच्या खेळातील भांडी, तुळशी वृंदावन, पोपट, कबूतर, चिमण्या, कुत्रा यांसारख्या खेळण्यांचा समावेश होता. सर्वाधिक मागणी असायची ती ‘सर्व धर्म समभाव’ वाढवणार्‍या खेळण्यांना. यात मारवाडी, महाराष्ट्रीयन, बंगाली पेहराव असलेल्या जोडप्यांच्या बाहुल्या तयार केल्या जात. १९७० च्या दशकात बाहुल्या ५० पैशांत डझनभर मिळायच्या. तर, नवरदेव-नवरी जोडीच्या बाहुल्या बाराण्यात म्हणजे ७५ पैशांना मिळत. लग्नात खेळणीरुपात दिले जाणारे संपूर्ण रुखवत सव्वा रुपयात मिळत. याशिवाय देवाच्या मूर्तींचीदेखील यात्रेत खरेदी केली जात.

‘डुगूडुगू’ मान हलवणार्‍या बाहुल्यांनाही कमालीची मागणी असायची. महत्वाचे म्हणजे या सर्वच खेळण्यांसाठी नैसर्गिक रंगाचा विशेषत: लाखेचा वापर व्हायचा. लहान मुलांनी खेळणीला तोंड जरी लावले तरी त्यापासून त्याला अपाय होऊ नये म्हणून नैसर्गिक रंग वापरला जात. प्रदूषणकारी सोनेरी, चंदेरी रंग कोणत्याही खेळणीत वापरला जात नसे. २००८ पर्यंत पेपर पॉलच्या खेळण्या यात्रेत उपलब्ध होत्या. १९८० नंतर लाकडी खेळण्या यात्रेत स्वार झाल्या. सावंतवाडीतून या खेळण्या यात्रेत दाखल होत. शिवाय कलाकुसरीचे उत्तम कौशल्य असणार्‍या सुतारकाम करणार्‍यांची नाशिक जिल्ह्यात वाणवा नव्हती. तेदेखील सावंतवाडीच्या दर्जाची खेळणी बनवत. त्यात विशेषत: लाल बस, बैलगाडी, घोडागाडी या खेळण्यांची चलती होती. याशिवाय भोवरा, भिंगरी, प्राण्यांच्या प्रतिकृती, कार अशा खेळण्याही दुकानांमध्ये विक्रीला असायच्या. याच काळात प्लास्टिकच्या खेळण्यांनी यात्रेत प्रवेश केला. कमी श्रमात तयार होणारी ही खेळणी अल्प दरात विकली तरी परवडत होती. त्यामुळे प्लास्टिकच्या खेळण्यांनी यात्रेत पाय रोवले. प्रारंभी दोन्ही बाजूने तोंड असलेली प्लास्टिकची पोकळ बाहुली, बॅट, चेंडू या खेळण्या बाजारात आल्यात. त्यानंतर सर्वच खेळण्या प्लास्टिकमध्ये तयार होऊ लागल्या. तेव्हापासून माती, कागद आणि लाकडाच्या खेळण्यांचा ‘संसार’ कोलमडला.

- Advertisement -
मुखवट्यांची गंमत

यात्रेत लुकणाच्या मुखवट्यांचाही लौकीक असत. भाताचा भुसा, डिंक, वेखंड यांच्या मिश्रणापासून हे मुखवटे तयार होत. बच्चे कंपनी यात्रेपासून घरापर्यंत रावण, वाघ, सिंह यांचे मुखवटे घालूनच प्रवास करत. अधूनमधून गुरगुरत दुसर्‍याला घाबरवण्याचा प्रयत्न करत. १९७० च्या दशकात पाच पैशाला मिळणारा हा मुखवटा १९९० पर्यंत साडेतीन रुपयांवर जाऊन पोहोचला. आता मात्र प्लास्टिकचे स्वस्तातील मुखवटे बाजारात आल्याने कागदी वा लुकणाचे मुखवटे कालौघात लुप्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -