घरनवरात्रौत्सव 2022यात्रेच्या आठवणी : गोडीशेव-रेवड्यांचा गोडवा

यात्रेच्या आठवणी : गोडीशेव-रेवड्यांचा गोडवा

Subscribe

नाशिक : लालभडक कुरकुरीत गोडीशेव-रेवडी आणि खुसखुशीत भत्त्याची चव जिभेवर रेंगाळल्याशिवाय यात्रेचा निखळ आनंद मिळू शकत नाही. वर्षांनुवर्षं नात्यांमधील गोडवा निर्माण करणार्‍या गोडीशेव-रेवडीची जादू पिझ्झा-बर्गरच्या जमान्यात आता कमी होऊ लागली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आणि पिझ्झा, बर्गरप्रेमी पिढीचे बदललेले जिभेचे चोचले यामुळे आता गोडीशेव- रेवड्यांचा गोडवा काहीसा कमी होतांना दिसतोय.

चिमुकल्यांपासून आबालवृद्धांपर्यंत लाल भडक रंगाची गोडीशेव व चविष्ट रेवडी घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नसायची. आजही यात्रेतील आठवणींसोबत गोडीशेव व रेवडीमुळे भाविकांच्या नात्यांमध्ये निर्माण होणारा गोडवा कायम आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे गोडीशेव व रेवडीचे दर वाढले आहेत. २० वर्षांपूर्वी २० रुपये किलोने मिळणारी गोडीशेव आज मात्र २०० रुपये किलोने मिळते आहे.

- Advertisement -

भाविक यात्रेतील जुन्या आठवणींना उजाळा देत गोडीशेव व रेवडी खरेदी करताना दिसून येत आहेत. ग्रामदैवत म्हणून लौकीक असलेल्या कालिकादेवीच्या यात्रोत्सवाच्या अनेक सोनेरी आठवणी जुन्या पिढीने जतन केल्या आहेत. पंचक्रोशीतील गावांतील प्रत्येकाने नवरात्रोत्सवाच्या काळात एकदा तरी या यात्रेचा आनंद लुटला आहे. कालिकादेवीच्या यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी हजारो भविक नाशकात येत. यातील असंख्य बैलगाडीने सहकुटुंब नाशिक गाठत. यात्रेत आल्यावर भाविक गोडीशेव आणि रेवडी आवर्जून खरेदी करत त्यावर ताव मारत. यात्रेतील गोडीशेव विक्रेते चमखाने हे सिन्नरहून रेवड्या विक्रीसाठी घेऊन आले आहेत. भाविकांच्या आनंदासाठी ७० वर्षांपासून गोडीशेव व रेवड्यांचा व्यवसाय ते करत आहेत. विशेष म्हणजे या व्यावसायिक परंपरेत त्यांना सुनील चमखाने, सुभाष चमखाने, वामन चमखाने, दिगंबर चमखाने हातभार लावत आहेत.

८५ वर्षीय तुळशीराम वक्राजी चमखाने यांनी यासंदर्भातील आठवणींचा पट ‘आपलं महानगर’कडे उलगडला. १९५६-५७ मध्ये गोडीशेव रेवडी चार आणेमध्ये पावकिलो तर, एक रुपयांत एक किलो मिळायची. दोन रुपयांत पोटभर फरसाण मिळत. जुन्या काळी भाविक समुहाने किंवा नातेवाईकांसोबत मोठ्या संख्येने येत. दिवसभर यात्रोत्सवाचा आनंद लुटायचे. हे भाविक सुरुवातीला मोठ्या आवडीने किलोभर गोडीशेव व रेवडी खरेदी करायचे. त्यावेळी प्लास्टिकची पिशवी नव्हती. भाविकांना कागदात गुंडाळून गोडीशेव व रेवड्या दिल्या जायच्या. हे घेतल्यानंतर भाविक झाडाखाली किंवा जागा मिळेल तेथे बसून आवडीने त्यावर ताव मारायचे. त्यातील अनेकजण हा मेवा घरी घेऊन जायचे. नाशिक शहराचा जसजसा विस्तार झाला तसा यात्रोत्सवात एकत्रित येणार्‍या भाविकांची गर्दी कमी होऊ लागली. पूर्वी साथरोगांची भीती नसायची. आता भाविक गर्दी येण्यापूर्वी साथीच्या आजारांचा विचार करतात. एकत्र कुटुंबपद्धती कमी होत चालल्याने आता केवळ पती-पत्नी व मुले येताना दिसतात. पूर्वी एकत्र कुटुंबातील सर्व सदस्य व त्यांचा मित्र परिवार यात्रेस येत. त्यामुळे गोडीशेव व रेवड्या खाताना जी मौज होती ती आता काहीशी दुर्मिळ झाली आहे. शिवाय, दिवसेंदिवस महागाईमुळे गोडीशेव व रेवडीचे दर वाढत आहेत. पूर्वी गोडीशेव व रेवड्यांना मोठी मागणी असायची. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ग्राहक कमी प्रमाणात गोडीशेव रेवडी घेतात. त्यामुळे नात्यांतला आणि यात्रेतलाही गोडवा काहीसा कमी झाल्याचे दिसतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -