मुंबईचं रक्षण करणाऱ्या देवींचे माहात्म्य

गणेशोत्स्वाप्रमाणेच नवरात्रौत्सव हा देखील मुंबईकरांसाठी खास उत्सव आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण या अख्ख्या मुंबईचं रक्षण देवी करते अस म्हटलं जात. यात मुंबादेवी ही प्रथमस्थानी जरी असली तरी मुंबईला महालक्ष्मी, सात आसरा मनमाला देवी, प्रभादेवी, शीतलादेवी अशा देवींचाही विशेष आशिर्वाद लाभला आहे.

मुंबादेवी
दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात मुंबादेवीचे मंदिर आहे. याच देवीच्या नावावरून मुंबईला नाव पडलं आहे.. मुंबादेवीची मनोभावी पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात. आज या ठिकाणी शिवाजी महाराज टर्मिनस जरी असलं तरी एकेकाळी येथे तीन मोठी तळी आणि बाजारपेठ होती. तेव्हा या मंदिराची स्थापना कोळी बांधवांनी केली. मुंबई हे एक बेट असून चहूबाजूने समुद्राने वेढलेले आहे. यामुळे या समुद्रापासून मुंबईचे रक्षण ही मुंबादेवी करते. अशी कोळी बांधवांची आस्था आहे.

महालक्ष्मी-
मुंबादेवीबरोबरच मुंबईला महालक्ष्मी मातेचा आशिर्वाद लाभला आहे. मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील भुलाभाई देसाई मार्गावर महालक्ष्मी मंदिर आहे. १८३१ मध्ये धाकजी दादाजी या हिंदू व्यापाऱ्याने हे मंदिर उभारलं होतं. या मंदिरात त्रिदेवी देवी महाकाल, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्याही प्रतिमा आहेत. देवीच्या नाकात सोन्याची नथ, सोन्याच्या बांगड्या आणि मोत्यांच्या हाराने या प्रतिमांना सजवण्यात आलं आहे. या मंदिर उभारणीमागेही मोठी रंजक कथा आहे. इंग्रजांनी महालक्ष्मी आणि वरळी मार्ग जोडण्यासाठी ब्रींच कँडी मार्ग बनवण्याची योजना बनवली होती. पण समुद्रातील उत्तुंग लाटांमुळे या बांधकामात अनेक अडचणी येत होत्या. ही भिंत उभारणीसाठी हजारो मजूर काम करत होते.पण रोज काही ना काही अपशकुन होत होता. याचदरम्यान, कंत्राटदार रामजी शिवाजी याच्या स्वप्नात महालक्ष्मी माता आली. वरळी समुद्राच्या किनारी माझी एक मूर्ती आहे. ती मूर्ती तिथून हटवा आणि सुमद्र किनाऱ्यावर त्याची स्थापना करा. त्यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील असे देवीने स्वप्नात येऊन सांगितल्याचा दावा केला. त्यानंतर धाकजी दादाजी या व्यावसाय़िकाने या मंदिराची उभारणी केली. तसेच मंदिर परिसराचाही जीर्णोद्धार केला. मनातील इच्छा महालक्ष्मी पूर्ण करते अशी भाविकांची भावना आहे.

प्रभादेवी मंदिर
प्रभादेवी मंदिराला प्रभाती देवी मंदिर या नावानेही ओळखले जाते. दादरजवळील प्रभादेवी येथे हे मंदिर असून प्रभादेवी देवीची मूर्ती १२ व्या शताब्दीची आहे. या मंदिराची स्थापना १७१५ साली करण्यात आली असून या मंदिराला ३०० वर्षांचा जुना इतिहास आहे. इतिहासकाराच्या मते प्रभादेवी मंदिरातील मुख्य देवता असलेल्या देवीला शाकंभरी देवी देखील म्हटल जात. गुजरात मधील यादवकुलीन राजा असलेल्या बिम्बा राजाची कुलदेवी होती.मुंबईतील श्याम नायक नावाच्या व्यक्तीला देवीने स्वप्नात साक्षात्कार दिला. त्यानंतर सर्वप्रथम श्याम यानेच मंदिराच्या बांधकामासाठी पुढाकार घेतला. ही मूर्ती कर्नाटक येथे स्थानांतरित करण्यात आली होती. पण मुगल राज्याच्या आक्रमणानंतर तिला पुन्हा प्रभादेवीत स्थानापन्न करण्यात आले.

 

शीतलादेवी
शीतलादेी मंदिर हे मुंबईतील एक अस एकमेव मंदिर आहे जिथे सर्वधर्मिय देवीच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराला ३०० वर्षाचा इतिहास लाभला आहे. शीतला देवीची मूर्ती स्वयंभू असून कोळी बांधवांना ती समुद्रात सापडली होती. कोळी बांधव, पाठारे प्रभु , सूर्यवंशी, आगरी समाज आणि राजस्थानी समाजाची शितला देवी कुलदेवता आहे.या मंदिराच्या प्रांगणात हनुमान, गणेश,शांता दुर्गा त्रिमूर्ती काली, विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. नवरात्रीत येथे भाविकांची मंदियाळी असते. सुख समृद्धीसाठी , रोगराईपासून संरक्षण होण्यासाठी भाविक देवीची उपासना करतात.

श्री सात आसरा मनमाला मंदिर-

माटुंग्याची सात आसरा मनमाला मंदिर ही माहिम आणि माटुंग्याची ग्रामदेवताची आहे. दोनशे वर्षांचा इतिहास असलेले हे मंदिर आहे. पूर्वी येथे तलाव होता. याच तलावातून देवी प्रकट झाल्याचे सांगण्यात येते. या देवी मंदिराच्या प्रांगणातच खोकला देवी, शीतला देवी, मनमाला देवी, केवडावती देवी, चंपावती, जरीमरी, संतोषी देवी आहेत.या सातही देवींमुळे या मंदिराला सात आसरा मनमाली देवी म्हणून संबोधले जाते.
यातील खोकला देवीच्या प्रसाद खाल्ल्यास खोकला बरा होता. तर मंदिरातील विहीरीतील पाणी पिल्यास त्वचारोग बरा होतो. अशी भाविकांची श्रद्धा आहे.