सप्तश्रृंगी देवी अर्धे नव्हे पूर्ण शक्तीपीठच

पौराणिक संदर्भानुसार माहिती उपलब्ध

Saptshrungi Gadh

महाराष्ट्रात पूर्वापार साडेतीन शक्तीपीठ म्हणून जे पूजले जातात, त्यापैकी अर्धे पीठ मानण्यात आलेले (कोणताही शास्त्राधार नाही) वणीच्या सप्तशृंगी देवीचे ठिकाण हे खरे तर महाराष्ट्रातील एकमेव पूर्णपीठ आहे. आश्चर्य वाटले ना? परंतु सत्यं वदं, हेच खरे आहे. भागवत पुराणात मात्र एकशेआठ शक्तीपीठांचा उल्लेख असून त्यापैकी तीन महाराष्ट्रात असल्याचे सांगण्यात आले आहे.

सती मातेची हनुवटी वणी गडावर पडल्याने तेथे हे शक्तीपीठ निर्माण झाले, ते स्वयंभू आहे. त्यामागे आख्यायिका आहे. (अर्थात काही ठिकाणी भद्रकाली परिसरातील भद्रकाली मातेचे मंदिर हे हनुवटी पडण्याचे ठिकाण मानले जाते.) सती ही ब्रह्माचा पुत्र दक्ष प्रजापतीची कन्या. दक्ष प्रजापतीने कनखल (हरिद्वार) येथे आयोजित केलेल्या ‘बृहस्पति सर्व’ नामक यज्ञसमारंभाप्रसंगी कन्या सती व जामाता शंकर यांना हेतूपुरस्सर आमंत्रित केले नाही. परंतु पित्याने केलेला यज्ञ म्हणून सती तेथे गेली व तेथे दक्षाने सर्व देवीदेवतांना हविर्भाग अर्पण केल्यावर शंकराला मात्र तो दिला नाही याचा अपमान वाटून सतीने यज्ञकुंडात उडी घेतली व शरीर नष्ट केले. अंतर्ज्ञानाने ही गोष्ट कळताच शंकरांचा संताप अनावर झाला व त्यांनी वीरभद्रास यज्ञ नष्ट व सर्वांना शासन करण्यास सांगितले. जळालेले सतीचे कलेवर घेऊन ते त्रिलोकात फिरू लागले तेव्हा हाहाकार माजला आणि महाविष्णुंनी सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे तुकडे केले. ते जेथे जेथे पडले तेथे शक्तीपीठांची निर्मिती झाली. सतीमातेची हनुवटी जेथे पडली त्या डोंगरावर शक्तीपीठ निर्माण झाले. कालांतराने त्याला सप्तश्रुंग गड म्हणण्यात आले. हीच माता सप्तश्रुंगी. आदिमाया भगवती खुद्द येथे विराजमान आहे. येथे देवीला भ्रामरी नावाने संबोधण्यात येते, विकृताक्ष हा येथे मातेचा भैरव आहे. तो मातेच्या खालीच दहा पायर्‍यांवर आहे.

दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडतात. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावांचा आद्यग्रंथ लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की, राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथसंप्रदायाच्या नवनाथ भक्तीसार या ग्रंथात दुसर्‍या अध्यायात असे वर्णन येते की, गुरू दत्तात्रेय व महादेव अरण्यात गमन करत असताना महादेवांना तेथे कुणीतरी योगी तपश्चर्या करत असल्याचे कळते ते दत्तगुरुंना त्यांना आणण्यासाठी पाठवतात तर ते मच्छिंद्रनाथ असतात. हे दोघे त्यांना सांगतात की, तुझी इच्छा आदिशक्ती सप्तश्रुंगी देवी पूर्ण करेल आणि शाबरी विद्येची खरी सुरुवात सप्तश्रुंग गडावरून होते. संत निवृत्तीनाथांनीदेखील समाधी घेण्यापूर्वी काही काळ सप्तश्रुंग गड येथे साधना केली असल्याचे उल्लेख आहेत.

साईबाबांच्या काळातीलही एक संदर्भ देता येईल बाबांनी आपल्या एका भक्ताची मनोकामना पूर्ण होण्यासाठी सप्तश्रुंगी मातेला नवस केला होता व ते दर्शनासाठी येथे आलेही होते. या देवीचा विडा प्रसाद म्हणून नेण्याची परंपरा भक्तांमध्ये आहे. नागवेलीचे पान, काथ, चुना व सुपारी टाकून बनविण्यात येणारा विडावणीची देवी आदिमाया सप्तश्रुंगी मातेच्या मुखात ठेवला जातो. विड्याच्या पानाची उत्पत्ती कथा मजेशीर आहे, त्यातील फॅण्टसी थोडी बाजूला ठेवून गर्भितार्थ घेतला तर आपल्या लक्षात येईल की आपली संस्कृती किती व्यापक आहे. समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने हे उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून एक वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले. भोजन झाल्यावर देव देवता या नागवेलीच्या पानाचाविडाआवडीने खाऊ लागले. त्यातूनच पुढे महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचाविडाठेवण्यात येऊ लागला. त्यावेळी सर्व देवांनी या विड्यास आशीर्वाद दिला की आम्ही तुझ्यामध्ये वास करू आणि सर्व देवीदेवता त्यात विराजमान झाले. त्यामुळे विड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विषय आहे, सप्तश्रुंगी मातेच्या विड्याचा. देवीच्या मुखात पूर्वापारविडाठेवण्यात येतो. मानवी देहामध्ये शक्तीचे सात पुंजके असतात, कुणी त्याला कुंडलिनी म्हणते, कुणी आणखी काही. या शक्तीपुंजक्याला सकारात्मक ऊर्जा हाविडादेतो. नागवेल हादेखील एक शक्तीपुंज आहे. वणीच्या सप्तश्रुंगी देवीच्या मुखातील नैवेद्य असलेल्या नागवेलीच्या पानाने देहात वाणीशक्ती प्राप्त होत असते.

शरीरामधल्या डिस्टर्ब झालेल्या मार्गाला वणीच्या देवीचा हा प्रसाद दुरुस्त करतो. तमोगुण, रजोगुण व सत्त्वगुण हे पूर्णपणे जागृत झाल्यानंतर तुम्ही देवत्वाकडे जातात, तुम्ही सिद्ध होतात. भक्ती-शक्तीचे पीठ असलेल्या गडावरच्या देवीकडे आपण काय मागावे हे आपल्याला कळले पाहिजे. ही देवी आध्यात्मिक देण्याचे सामर्थ्य ठेवते त्यामुळे तिच्याकडे ते मागा. आपण मनोमन जे मागतो ते देवी ऐकत असते. आपल्या मनातले भाव ती ओळखत असते. परंतु, तरीही देवाजवळ काही मागावयाचे असल्यास ते मोठ्याने मागा. तुम्ही बोलल्याने जे शब्द बाहेर येतात, त्या स्पंदनांमध्ये तो वर पूर्ण करण्याची शक्ती असते.

संदर्भ
1. मार्कंडेय ऋषी रचित मार्कंडेय पुराण
2. देवी सप्तशती
3. धुंडिसूतमालूकवीरचित
नवनाथ भक्तीसार
4. देवी भागवत व देवी विजय
5. लीळाचरित्र