वणीची सप्तशृंगी देवी

शक्तीपीठ नाशिक येथे नवरात्रोत्सवला प्रारंभ

Saptashrungi-Devi-Temple
श्री सप्तश्रुंगी चरणी लाखो भाविक लीन झाले.

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांमध्ये अर्धे शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथे श्री सप्तशृंगी देवीचे मंदीर आहे. महाराष्ट्रातील श्रध्दाळूंचे हे जागृत दैवत नाशिकपासून 55 किलोमिटर आहे. नांदूरी गाव सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी आहे. गडावर जाण्यासाठी 11 किलो मीटरच्या रस्ता घाटातून जातो. ज्या गडावर देवीचे देऊळ आहे. त्या गडाला सात शिखरे आहेत. नवरात्रोत्सवात वणीच्या गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भाविकांच्या उदंड उत्साहात यंदा नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. परंतु, भाविकांना मर्यादा घालण्यात आल्यामुळे यात्रोत्सवाचे स्वरुप यंदा बदलले आहे.
सप्तश्रृंगीगड निवासीनी म्हणून भगवतीचा उल्लेख होतो. देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर उभा आहे. सप्तश्रृंग गडावर अनेक औषधी वनस्पती व पवित्र कुंडे आहेत. रामायणातील एका ऋचेनुसार हनुमानाने याच डोंगरावरून जखमी लक्ष्मणाच्या उपचारासाठी एक मुळी नेली होती. वणीच्या गडावर शिवालय तीर्थ, शीतला तीर्थ, व कोटी तीर्थ अशी एकूण १०८ पवित्र कुंडे आहेत.
नवरात्रात भव्य यात्रा
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.
देवीची मूर्ती
सप्तश्रृंगी देवी खानदेशी देवी म्हणून प्रसिध्द आहे. विशेषत: चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे या भागातून भाविक फार येतात. मंदिरात उच्चासनावर उभी असलेली देवीची मूर्ती 9 फूट उंच आहे. तिला 18 हात आहेत. ती पाषाण मूर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचीत कललेली मान, आठरा हातात आठरा विविध आयूधे असा देवीचा थाट आहे. 470 पायर्‍या चढल्याचे देवीच्या प्रसन्न दर्शनाने सार्थक होते. हात नतमस्तक होऊन आपोआप जोडले जातात. दर पौर्णिमेला व नवरात्रात येणार्‍या भविकांनी गड गजबजून जातो.
चैत्री पौर्णिमेला सुमारे एक लाखाच्यावर भाविक येतात. देवीचा गाभारा ओटीचे खण, नारळ व साड्यांनी भरून जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून देवी प्रकट झाली होती. सिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या 18 हातात निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून या देवीला ‘महिषासूरमर्दिनी’ असेही म्हणतात.
श्री जगदंबेची 51 शक्तिपीठे
श्री जगदंबेची 51 शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगितले जाते. या स्थानाचा ॠनवनाथ कालावधी’ स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते.