एसआरएस ग्रुपच्या गरबारास स्पर्धेत असणार दिग्गज कलाकारांची उपस्थिती

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साह संचारलेला असताना यंदा एसआरएस ग्रुपतर्फे शुक्रवारी (दि.30) सायंकाळी 6 वाजता नक्षत्र लॉन्स येथे गरबा डीजे नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. यात बॉलिवूडच्या प्रसिद्ध गाण्यांसह ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘झुकेगा नहीं साला’ हा गाण्यातील ट्रेंडही वापरात आला आहे. त्यामुळे यंदाच्या गरबा स्पर्धेची रंगत वाढणार आहे.

दैनिक आपलं महानगर, माय महानगर लाईव्ह, माय महानगर मानिनी माध्यम प्रायोजक असलेल्या या स्पर्धेत कलाकारांना भेटण्याची संधीही गरबा प्रेमींना उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेचे प्रशिक्षक अतुल चोपडे म्हणाले की, गरबा नृत्य हे गुजरातचे असले तरी त्याला महाराष्ट्रात आणून नवीन स्वरुप देण्याचा प्रयत्न आपण करतो. यात तीन थाली, दोन थाली, सनेडो स्टेप्स् या कॉमन स्टेप्स् झाल्या. या व्यतिरिक्त सालसा, बॉलिवूड साँग्ज्साठी तरुणाई फार उत्साही असते. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘झुकेगा नहीं साला’ या गाण्यातील स्टेप्स् तरुणांना फार आवडतात. आपण त्या गरबा नृत्यात बसवल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवाला तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं फेम पूनम देशमुख, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोडक, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नाशिककरांनी या दांडीया गरबा रास कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन एसआरएस गु्रुपच्या संयोजिका रोशनी राठी, सई संघई, साधना गिललकर यांनी केले आहे.

या वर्कशॉपमध्ये सहभागी होणार्‍यांना घूमर, भवाई, दांडीया रास, डिस्को गरबा व नृत्याचे धडे दिले जात आहेत. या वर्कशॉपला नाशिकककर दांडियाप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. : रोशनी राठी, संयोजिका

तरुणांना बॉलिवूड गाण्यांची फार क्रेझ असते. त्यामुळे या गाण्यांसह पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यांवर स्टेप्स् आपण गरबा नृत्यात बसवल्या आहेत. त्या सर्व तरुणांना आवडतील. : अतुल चोपडे, प्रशिक्षक