पहिणे नवरा सुळक्याहून नवदुर्गांना नमन

साहसी मोहीम स्त्री जन्मास समर्पित

सह्याद्री खोर्‍यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा २६० फूट उंची असलेला पहिणे नवरा सुळका टीम पॉईंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली सर करत गिर्यारोहकांनी नवदुर्गांना नमन केले. स्त्रीशक्तीचा जागर करीत अभिमानाने तिरंगा फडकावत केलेली ही साहसी मोहीम स्त्री जन्मास समर्पित केली गेली.
या मोहिमेची सुरुवात लक्ष्मणपाडा, पहिणे गाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथून झाली. सुरुवातीला शेतालगत असणार्‍या बांधाने जात छोटा ओढा पार करावा लागतो. येथूनच घनदाट जंगलातील खड्या चढाईचा मार्ग नवरा-नवरी सुळक्याच्या पायथ्याला घेऊन जातो. आरोहणासाठी एक तास लागतो. खडकांच्या खाचांमध्ये हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून चिकाटीने आरोहण करावे लागते. अंगावर येणारा खडक हा गिर्यारोहकांची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारा आहे. पहिला ४० फूटी टप्पा पार केल्यावर अंगावर येणारा १० फूटी टप्पा पार करीत तोल सांभालून पुढचा १५ फूटी टप्पा गिर्यारोहकांची परीक्षा घेणारा आहे. यानंतर १५ फूटी टप्पा व त्यानंतर शेवटचा अवघड असा अंगावर येणारा १० फुटी खडकाळ टप्पा पार करून शिखर सर करता येते.
सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली रोहित जाधव, डॉ. समीर भिसे, शिवाजी जाधव, अथर्व शेटे, प्रमोद अहिरे, राहुल भालेकर, प्रशांत कुदळे, कमलसिंग क्षत्रिय, सुमेश क्षत्रिय, कविता बोटले, ज्योती राक्षे-आवारी, वर्षा अष्टमवार, माधुरी पवार, वंदना कुलकर्णी, डॉ.प्रियंका हिंगमीरे, सुदर्शन हिंगमीरे, उमेश कातकडे, समीर देवरे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.