घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र३०० मिनिटांत ३०० व्यक्तींचे लसीकरण

३०० मिनिटांत ३०० व्यक्तींचे लसीकरण

Subscribe

कोरोनाविरोधातील लढ्यात नामको हॉस्पिटलचा नवा विक्रम

नाशिक शहरातील नामको हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेने शुक्रवारी (दि. २) ३०० मिनिटांत ३०० व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करत नवा विक्रम प्रस्थापित केला. नावनोंदणी, कागदपत्र पडताळणी, लसीकरण अशा प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नामको हॉस्पिटलने केलेली असल्याने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा विक्रम साधला गेला.

केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार नामको हॉस्पिटलमध्ये महिनाभरापासून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला सुरुवात झाली आहे. त्यासाठी हॉस्पिटलतर्फे विशेष व्यवस्थाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी, विशेषतः ज्येष्ठांसाठी प्रशस्त, हवेशीर बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा व आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.२) लस घेण्यासाठी सकाळी ९ वाजेपासूनच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाचे अचूक व्यवस्थापन, शिस्तबद्ध पद्धतीने होणारी नावनोंदणी आणि प्रत्येक प्रक्रियेसाठी स्वतंत्र व्यवस्था यामुळे गर्दी असूनही अत्यंत सुरक्षित आणि सुरळीतपणे सर्वांचे लसीकरण करण्यात आले.

- Advertisement -

महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने पात्र नागरिकांचे लसीकरण नियमित सुरू आहे. या ठिकाणी मोफत नावनोंदणीचीही व्यवस्था करण्यात आलेली असल्याने नोंदणी न झालेल्या व्यक्तींनी येताना आधारकार्ड अथवा मतदार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी केले आहे.

लसीकरणासाठी मिळणारा प्रतिसाद पाहता नाशिककरांचा नामको रुग्णालयाप्रति असलेला विश्वास अधोरेखित झाला आहे. हॉस्पिटलचे अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या पाठबळामुळेच या विक्रमापर्यंत पोहोचता आले. यापुढेही नाशिककरांचा असाच प्रतिसाद मिळेल आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू, यात शंकाच नाही.
– शशिकांत पारख, सेक्रेटरी, नामको चॅरिटेबल ट्रस्ट

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -