धुळे शहरात वर्षभरात ६१४ अपघात; ३४० मृत्यू

रस्ता सुरक्षा समिती बैठकीत महामार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चितीच्या सूचना

धुळे : महामार्गांवर अपघात होऊन मृत्यूमुखी पडणार्‍यांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरते आहे. अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी ब्लॅकस्पॉट निश्चित करून महामार्गांवरील अपघातप्रवण क्षेत्रांच्या ठिकाणी गतिरोधकांपूर्वी दिशादर्शक फलक लावावेत, अशा सूचना रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्या.

धुळे जिल्हास्तरीय समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी महामार्गांवरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. धुळे जिल्ह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. जिल्ह्यात ३ लाख ५८ हजार ३९६ नोंदणीकृत वाहने आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ६१४ अपघात होऊन तब्बल ३४० जणांचा मृत्यू झाला. तर, ६७८ जण जखमी झाले. अपघात टाळण्यासाठी समितीच्या माध्यमातून तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

समितीच्या माध्यमातून तात्पुरत्या व दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या अपघातस्थळांचे विश्लेषण करून अहवाल सादर करावा. तसेच, समितीच्या मान्यतेशिवाय गतिरोधक कार्यान्वित करू नयेत, असेही सांगितले.

या उपाययोजनांचा समावेश

रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी पहिल्या टप्प्यात ब्लॅक स्पॉट निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, अपघात टाळण्यासाठी तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. ब्लॅक स्पॉट निश्चित करून केलेल्या उपाययोजनांनंतरचा अहवालही सादर करावा. जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवर आवश्यक तेथे वाहतुकीबाबत सूचना, दिशादर्शक चिन्हे, फलक लावावेत. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाने मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.