अधीक्षक, मुख्याध्यापकांच्या निलंबनासाठी विद्रोही संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन

आदिवासी विद्यार्थी साहित्य चोरीप्रकरण

Bombabomb

राजूर – आदिवासी आश्रमशाळा मवेशी येथून आदिवासी विद्यार्थ्यांच्या साहित्याची चोरी झाली असून, त्यास अधीक्षक व मुख्याध्यापक जबाबदार आहेत. त्यांना तातडीने निलंबित करावेत, अशी मागणी करत विद्रोही संघटनेने गुरुवारी (दि.७) राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून ‘बोंबाबोंब’ ठिय्या आंदोलन काढून निषेध केला.

एक तासानंतर आदिवासी प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांच्यासोबत आंदोलकर्ते स्वप्निल धांडे, नामदेव भांगरे, झडे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पालक यांची चर्चा झाली. याप्रकाणी आठ दिवसात ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन भवारी यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. त्यानंतर मिळाल्यानंतर आंदोलन पुढील निर्णय होऊपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती स्वप्निल धांडे यांनी दिली.

तालुक्यातील मवेशी येथील एकलव्य आश्रमशाळेत कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या १० पेट्या चोरीस गेल्या असून, पालकांनी मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी काही पालकांना नुकसान भरपाई रोख स्वरूपात देण्यात आली. मात्र, काही पालक विद्रोही संघटनेकडे गेले. संघटनेने एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार राजूर प्रकल्प अधिकारी यांचेकडे दिली. मात्र, दखल घेतली नसल्याचे कारण देत गुरुवारी (दि.७) सकाळी ११ वाजता राजूर प्रकल्प कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

स्वप्नील धांडे यांनी विद्यार्थ्यांचा जीवनाशी खेळणार्‍या प्रशासनाचा धिक्कार करून संबधित मुख्याध्यापक व अधीक्षक यांना निलंबित करण्याची मागणी केली. प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांनी तातडीने संबंधितांची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.