रेखा जरे प्रकरण : बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला

बोठेने जामीनासाठी १४ जुलै रोजी न्यायालयात दाखल केला होता अर्ज

rekha jare murder case accused Journalist bal bothe arrested on third ransom charge

हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठेचा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. जरे यांच्या हत्येनंतर पोलिसांनी मारेकर्‍यांसह पाच जणांना अटक केली. या आरोपींनी जरे यांच्या हत्येची सुपारी पत्रकार बाळ बोठे याने दिली असल्याचे सांगितले.

पोलीस तपासात नाव समोर आले असल्याची माहिती बोठेला समजताच तो फरार झाला. त्याला १०२ दिवसांनंतर हैद्राबाद येथील बिलालनगर परिसरातून अटक करण्यात आली. या हत्या प्रकरणाचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी न्यायालयात दाखल केले आहे. बोठेने नाजूक प्रकरणातून जरे यांची हत्या केली असे दाखल दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत पारनेर येथे आहे. बोठेने जामीनासाठी १४ जुलै रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर बुधवारी दुपारी सुनावणी झाली आरोपीच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले आणि सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकार वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी युक्तिवाद केला. युक्तिवादानंतर न्यायालयाने बाळ बोठेचा याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.