घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअकोले तालुक्यातील आदिवासी भाग योजनांपासून वंचित

अकोले तालुक्यातील आदिवासी भाग योजनांपासून वंचित

Subscribe

ना रेशन कार्ड, ना आधारकार्ड, ना रहिवासी दाखला

अकोले : तालुक्याच्या आदिवासी भागातील वाकी, शेणीत, खिरविरे परिसरातील आदिवासी कातकरी समाजाची कुटुंबे हलाखीचे जीवन जगत आहे. या कुटुंबाना आजपर्यंत कोणत्याच सरकारी योजनांचा लाभ मिळाला नसून, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, आधारकार्ड सारखी कागदपत्रेही त्यांच्याकडे नाहीत.

प्रजासत्ताक दिनाच्या पाश्वर्र्भूमीवर ऑर्गनायझेशन फॉर राईट ऑफ ट्रायबल या संघटनेचे डॉ. विजय पोपरे, डॉ. विष्णू बुळे, ठाकर समाज संघटनेचे उपाध्यक्ष सोमनाथ मेंगाळ,वकील राजाराम बेंडकोळी, वाळीबा धोंगडे आदी कार्यकर्त्यांनी वाकी, शेणीत, खिरविरे गावांचा दौरा करून कातकरी समाजाची स्थिती जाणून घेतली. यावेळी ही सर्व कुटुंबे गरिबीचे जीवन जगत असल्याचे दिसून आले. सरकारी अनास्थेमुळे आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखल्यांसह आवश्यक शासकीय कागदपत्रे त्यांना मिळालेली नाहीत.

- Advertisement -

कागदपत्रे नसल्यामुळे रेशन, घरकुल, वृद्ध निराधार, विधवा परित्यक्ता महिला यांच्यासाठी असणार्‍या सामाजिक न्यायाच्या योजना अशा कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांना शेती व रोजगारही नाही. त्यामुळे अनेकांना प्रसंगी अर्धपोटी अथवा उपाशी रहावे लागते. मासे व खेकडे पकडून कसेबसे कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जात असल्याचे दुराबाई हिलम यांनी सांगितले.

तहसीलदारांकडून माहिती दिली जात नसल्याचा आरोप

कातकरी ही मागासलेली आदिवासी जमात आहे. तिला आदिम जमातीचा दर्जा देण्यात आलेला आहे. या आदिम जमातींसाठी शासन विशेष योजना राबविते. असे असतानाही तालुक्यातील आदिवासी कातकरी कुटुंबांवर अशी वेळ यावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कातकरी कुटुंबांच्या प्रश्नासंदर्भात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहासीलदारांची भेट घेतली. मात्र, यावेळी तहसिदारांनी उडवाउडवीची उत्तरे देत कार्यकर्त्यांना अवमानित केले असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या कुटुंबांचा प्रश्न न सुटल्यास व त्यांना न्याय न मिळाल्यास आदिवासी समाज संघटना, कोळी महादेव समाज संघटना आंदोलन करतील इशारा डॉ. विजय पोपरे, सोमनाथ मेंगाळ, वाळीबा धोंगडे, विजय पिचड, सागर मुकणे, अशोक हिलम या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -