घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंगमनेरमध्ये कोरोनाचा उद्रेक; २५ हजार रुग्ण

संगमनेरमध्ये कोरोनाचा उद्रेक; २५ हजार रुग्ण

Subscribe

डॉक्टरांवर होणार गुन्हे दाखल

संगमनेर तालुक्यातील पठारभागातून मोठ्या संख्येने रुग्ण समोर येवू लागल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी गुरूवारी (दि. २९) साकूरला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी दुपारी चारनंतरही दुकाने सुरु ठेवणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून, साकूर गटातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून शनिवार (दि.३१) पासून ते रविवार (दि. ८) ऑगस्टपर्यंत १० दिवस संपूर्ण गटात स्वयंस्फूर्तीने ‘लॉकडाऊन’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास साकूरच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कोरोनाच्या पाश्वर्र्भूमीवर गुरूवारी साकूर येथील ग्रामसचिवालयाच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी आधिकार्‍यांसह स्थानिक पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, जिल्हा परिषद बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, साकूरचे उपसरपंच शंकरपाटील खेमनर, कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, किरण मिंढे, ग्रामसेवक विजय आहेर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

तर ग्रामसेवक, तलाठ्यांवर कारवाई

लग्न सोहळे आणि दहाव्याचे कार्यक्रम होत असून, नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा सोहळ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवक व तलाठ्यांची आहे. मात्र, ते देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. अशा कार्यक्रमातून रुग्णसंख्या वाढल्याचे समोर आल्यास ग्रामसेवक व तलाठ्यांना कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिला आहे.

नियम उल्लंघनामुळे रुग्णांंमध्ये वाढ

संगमनेर तालुका व त्यातही साकूर भागात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करुन नियमांचे उल्लंघन याला कारणीभूत आहे. साकूरसह पिंपळगाव, हिवरगाव पठारसह आदी गावांमधून दररोज 30 ते 35 रुग्ण आढळत असल्याची गंभीर बाब आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
माहिती न देणार्‍या

- Advertisement -

डॉक्टरांवर होणार गुन्हे दाखल

पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील रुग्ण कमी होत असताना आपल्या जिल्ह्यात अचानक होणारी रुग्णवाढ धक्कादायक आहे. अनेक खासगी डॉक्टर रुग्णांची रक्त चाचणी पॉझिटिव्ह येवूनही, त्या रुग्णांची माहिती प्रशासनाला देत नाहीत. अशा डॉक्टरांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर
यांनी दिली.

४१६ नवे रुग्ण बाधित

तालुक्यात तब्बल दोन महिन्यानंतर बाधित रुग्ण सापडण्याचा उद्रेक झाला आहे. तालुक्यातील पठारभागातील २४ गावांतील १०७ रुग्णांचा समावेश आहे. तर साकूरमधून तब्बल ६४ बाधित रुग्ण समोर आले आहेत. गुरुवारी १२५ व बुधवारी तब्बल २९१ नवे रुग्ण बाधित आढळून आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या २४ हजार ७३१ वर गेली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत चुकांकडे दुर्लक्ष करुन त्याच चुका पुन्हा होवू लागल्यामुळे संगमनेरसह जिल्ह्यातील काही तालुके कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सर्वाधीक फटका संगमनेर तालुक्याला बसत आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असल्याने विवाह सोहळ्यांना अधित्तम ५० तर अंत्यविधीसाठी अधित्तम २० जणांच्या उपस्थितीची परवानगी आहे. मात्र, या तालुक्यातील नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्यासारखी स्थिती आहे. शेकडोंच्या उपस्थितीत विवाह सोहळे साजरे होत आहेत. अंत्यविधीसाठीही उपस्थितीची मर्यादा असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्याच्या संक्रमणात धक्कादायक वाढ होत आहे. शासकीय प्रयोगशाळेचे १९, खासगी प्रयोगशाळेचे २२९ व रॅपिड टेस्टच्या निष्कर्षातून ११९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात शहरातील २७ जणांचा तर पठारभागातील तब्बल २०७ जणांचा समावेश आहे.

दररोज स्थलांतरीत होणार्‍या कामगारांची टेस्ट करा

साकूर परिसरातून दररोज दोनशे ते अडीचशे मजूर उपजीविकेसाठी जुन्नर तालुक्यात जातात. त्यासाठी पिकअप वाहनांचा वापर होतो. यापुढे त्या सर्वांच्या नियमित कोविड तपासण्या करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी अधिकार्‍याना दिल्या. लॉकडाऊनच्या काळात ज्या मजूरांना घरातच थांबावे लागेल त्यांची व्यवस्था ग्रामपंचायतीसह स्थानिक पदाधिकार्‍यांनी करण्याची सूचनाही त्यांनी केली. या परिसरातून भाजीपाला अथवा अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर बाहेरगावी जाणार्‍या चालकांना सक्तीने विलगीकरणात ठेवावे. साकूर जिल्हा परिषद गटाप्रमाणेच आश्वी गटातील रुग्णसंख्याही वाढत आहे. त्या ठिकाणीही स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळण्याची गरज व्यक्त करताना हिवरे बाजारच्या धर्तीवर ‘साकूर’ पॅटर्न राज्याला दिशादर्शक ठरेल, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -