तरुणांची कमाल! स्वखर्चाने बुजवले खड्डे, गावकऱ्यांना दिलासा

खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक छोटे-मोठे अपघात होत असल्याने घेतला पुढाकार

ghargaon road repairing

घारगाव – संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुटवाडी येथील रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ खड्डे पडले होते. त्यामुळे खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक छोटे-मोठे अपघातही होत आहेत. हा धोका लक्षात घेत अखेर बुधवारी (दि.६) गावातील तरूणांनी एकत्र येत जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने स्वखर्चातून खड्डे बुजवले.

गेल्या काही दिवसांपासून कुरकुटवाडी रस्त्यावर मोठ खड्डे पडले होते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असे. त्यातच खड्डे वाचवण्याच्या नादात अनेकदा अपघातही झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, यासाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनही केले होते. अखेर बुधवारी(दि.६) सकाळी सरपंच नूतन कुरकुटे, उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे, निखील कुरकुटे, सुनील कुरकुटे, पांडुरंग कुरकुटे, तुषार कुरकुटे, राहुल कुरकुटे, विश्वास कुरकुटे, प्रमोद कुरकुटे आदी तरूणांनी एकत्र येत स्वखर्चातून जेसीबी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून कुरकुटवाडी ते पाणोबा माथ्यापर्यंत मुरूम टाकून खड्डे बुजवले.

दरम्यान, आमदार डॉ. सुधीर तांबे हे त्या ठिकाणाहून जात होते. त्यावेळी त्यांनी थांबून सर्व तरूणांशी चर्चा केली. त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्याशी संपर्क साधत मंजूर असलेले काम का सुरू केले नाही, असे विचारले.

त्यावर अभियंता पाटील यांनी सांगितले की, पावसाळा सुरू आहे. आता दोन दिवसात काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, उपसरपंच पांडू शेळके, यशवंत शेळके, दिनेश पावडे,अक्षय कालेकर,संजय कालेकर,लहु शिंदे,शिवाजी कुरकुटे ,संकेत कुरकुटे,लहुज्ञा कुरकुटे, अंकुश कुरकुटे, संग्राम काकड आदी उपस्थित होते.