जळगाव : कोरोना निर्बंधांबाबत गुरूवारी फैसला

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

first day of night curfew in mumbai

जळगाव : कोरोनाचा धोका वाढत असतानाच गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील रूग्णसंख्येचा विचार करता गुरूवारी (दि. १३) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे संकेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात कोणते नवे निर्बंध लादले जाणार याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

मंत्री पाटील यांच्या हस्ते जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात मोबाईल लसीकरण व्हॅनचा शुभांरभ, फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे घोषित केले होते.

त्यानुसार बूस्टर डोस देण्याची जळगाव जिल्ह्यातील मोहीम आजपासून ‘जीएमसी’त सुरू करण्यात आली. डॉ. सुशांत सुपे यांना पहिला बुस्टर डोस देण्यात आला. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, दुर्गम भागासह जिल्हाभरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. सोमवारी दोन लसीकरण वाहनांचे लोकार्पण करण्यात आले आहे.
डॉ. रामानंद म्हणाले, की मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असल्याने आरोग्य कर्मचार्‍यांना बूस्टर डोस देण्याला आता सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी मदत होणार आहे. तिसर्‍या लाटेसाठी जीएमसी सुविधांनी सज्ज झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.