जळगाव : ब्युटीपार्लर चालक महिलेवर बलात्कार

फेशिअलच्या बहाण्याचे हॉटेलमध्ये नेत अत्याचार; ५० हजारांची मागणी

rape

जळगाव : येथील ब्युटी पार्लरचालक महिलेवर फेशियल करण्याच्या बहाण्याचे हॉटलमध्ये बोलावून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या व्यक्तीने पीडितेला हॉटेलवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला, शिवाय त्याची अश्लिल व्हिडियो क्लिप बनवून पीडितेला ब्लॅकमेल करत 50 हजारांची मागणी केली.

याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गणेश प्रकाश चौधरी (वय ४८) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो जळगाव शहरातील तुळसाई नगर भागात रहातो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ब्युटीशिअन असून तिचं जळगाव शहरात ब्युटी पार्लर आहे.

आरोपी गणेश यानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरून तिच्याशी संपर्क साधला. यानंतर ओळख वाढवून पीडितेशी चांगली मैत्रीही केली. यातून त्यांच्या प्रत्यक्षात भेटीगाठी वाढल्या. दरम्यान, जानेवारी महिन्यात आरोपी गणेशने पीडितेला भेटायला बोलावून मोबाईल भेट दिला. तसेच मला माझ्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचं असल्याने मला फेशियल करून दे म्हणत भेटण्याची मागणी केली. महिलेने होकार दिल्यानंतर भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलात त्यांची भेट झाली. याठिकाणी गणेशच्या नावानं आधीच खोली बूक होती. तिथे फेशिअल केल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर घाबरलेल्या महिलेनं आरोपीशी संपर्क तोडला. मात्र, त्याने अनेकदा माफी मागितल्यानंतर पीडितेने त्याला माफ केले. त्यानंतर पुन्हा दोघांत बोलणं होऊ लागलं. परंतु, पुन्हा पुन्हा आरोपीकडून शरीरसुखाची मागणी होऊ लागल्याने महिला त्याच्यापासून दुरावली. तेव्हा आरोपीनं दुसर्‍या एका क्रमांकावरून फोन करून पीडितेला बोलायचं नसेल तर माझा मोबाइल परत दे, असं सांगितलं. तेव्हा पीडिता मोबाइल देण्यासाठी गेली असता, आरोपीनं आपल्याकडील अश्लील व्हिडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल केलं. तसेच ५० हजार रुपये दे, नाहीतर माझ्याशी संबंध ठेव, अशी धमकी दिली.

पण पीडितेनं आरोपीला विरोध केला. तेव्हा आरोपीने तिच्या पतीला फेसबुकवर मेसेज करून 50 हजारांची मागणी केली. हा प्रकार पतीला कळताच त्याने पीडितेसह रामानंद नगर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.