मविप्र निवडणूक : संस्थेत १० हजार १९७ मतदार; सेवक घटले

नाशिक : राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचा बिगूल वाजला आहे. येत्या 28 तारखेला मतदान होणार असून, 29 तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत यंदा 10 हजार 197 मतदार हक्क बजावणार आहेत. तर सेवक संचालकांच्या तीन जागांसाठी 463 सेवक सभासद मतदानास पात्र ठरणार आहेत.

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीची रविवार (दि.31) रोजी घोषणा झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सभापती व उपसभापती या सहा प्रमुख पदांसह दोन महिला संचालक, 13 तालुका संचालक आणि तीन सेवक संचालक अशा एकूण 24 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक 2903 मतदार आहेत. त्यापाठोपाठ सटाणा 1496, नाशिक ग्रामीण 707, चांदवड 684, मालेगाव 783 याप्रमाणे मतदारांची विभागणी झाली आहे. कोरोनामुळे संस्थेच्या बहुतेक सेवकांचे निधन झाल्यामुळे या मतदारांची संख्या घटली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडावी म्हणून अ‍ॅड.भास्करराव चौरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यात सदस्य म्हणून अ‍ॅड. रामदास खांदवे, अ‍ॅड.महेश पाटील तर सचिवपदी डॉ.ज्ञानेश्वर काजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शुक्रवारपासून अर्ज

मविप्र निवडणुकीत उमेदवारी अर्ज वाटप करण्यासाठी 5 ते 11 ऑगस्टपर्यंत मुदत राहणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 7 ते 11 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. अर्जांवरील हरकती, अपात्र अर्ज व त्यावरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 16 ऑगस्ट रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. उमेदवारांना माघारीसाठी 19 ऑगस्टला संधी दिली जाईल. मतदान 28 तर मतमोजणी 29 ऑगस्टला होणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत हा झाला बदल

मविप्रच्या कार्यकारिणीत बदल करण्यात आला असून, या वर्षापासून दोन महिला संचालकांची वाढ करण्यात आली आहे. यासाठी दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. तर 14 जून 2022 रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने उपाध्यक्ष हे पद नव्याने निर्माण करण्यात आले आहे. संचालकांची संख्या 21 आणि तीन सेवक संचालक अशा एकूण 24 जागांसाठी मतदान होणार आहे. संचालकांची संख्या वाढल्याने मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे.

दोन गटांमध्ये रंगणार सामना

सत्ताधारी नीलिमा पवार गटाचा सामना अ‍ॅड.नितीन ठाकरे यांच्या पॅनलशी होणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. दोन्ही गटांच्या इच्छुकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. त्यामुळे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.