अश्लील चित्रफितीव्दारे मागितली एक कोटीची खंडणी

अहमदनगर जिल्ह्यातील घटनेत महिलेसह साथीदारास अटक

Demand a ransom by threatening to make private video viral

अश्लील चित्रफित तयार करून त्याआधारे एक कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या महिलेसह तिच्या साथीदारास पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संबंधित महिलेकडून 69 हजार रुपये, सोन्याच्या अंगठ्या आणि तिच्या साथीदाराकडून 15 हजार रुपये जप्त केले आहेत, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. अमोल मोरे असे साथीदाराचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला जखणगाव (ता. अहमदनगर) येथे 26 एप्रिल 2019 रोजी बोलविण्यात आले होते. त्यावेळी महिलेने साथीदाराच्या मदतीने संबंधित व्यक्तीची अश्लील चित्रफीत तयार केली. त्याला चाकूचा धाक दाखवत दोरीने बांधले. त्याच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीची पाच तोळे वजनाची चेन, हातातील सहा तोळे वजनाच्या अंगठ्या, रोख 84 हजार रुपये असा एकूण 5 लाख 44 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला होता. त्यानंतर बदनामी टाळण्यासाठी महिलेने एक कोटी रुपयाची खंडणीची मागणी संबंधित व्यक्तीकडे केली होती. तसेच पैसे न दिल्यास चित्रफित पोलिसांना देत तुझ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील दिली होती.

याप्रकरणी संबंधित व्यक्तीने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत झालेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित महिला व तिच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधित महिलेस ताब्यात घेतल्यानंतर साथीदाराच्या मदतीने चित्रफित तयार केल्याची कबुली दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक आर. एन. राऊत करत आहेत.