उत्तर महाराष्ट्रावर पावसाचे सावट

काही ठिकाणी तुरळक सरी बरसणार, हवामान खात्याचा अंदाज

नाशिक : राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आकाशात अवकाळीच्या ढग जमून आले असले तरीही, पावसाचे वृत्त नाही. राज्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा स्थिर आहे.

गुरुवारी (दि.१४) जळगाव जिल्ह्यात तापमान ४२.२ अंशांवर स्थिर होता. तर, शुक्रवारी (दि.१५) उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदा मार्च महिन्याच्या मध्यंतरी पासूनच उन्हाचा पारा ४० अंशावर गेला होता. तर चालू महिन्यात राज्यातील काही ठिकाणी तो ४३ अंशावर गेला आहे. जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी देखील न्हाचा पारा ४३ अंशावर गेला होता. सध्या अवकाळीच्या ढगांनी गर्दी केल्याने गुरुवारी आकाश ६६ टक्के ढगाच्छादित होते. गुरुवारी (दि.१४) पारा ४२.२ अंशांवर स्थिरावले. वाऱ्याचा वेग ताशी १७ किमीपर्यंत असल्याने उष्णतेच्या झळांची तीव्रता मात्र चांगलीच वाढलेली आहे.

शुक्रवारपर्यंत (दि.१५) जिल्ह्यासह राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असेल. तुरळक पावसाचे सावट आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने कुठेही हजेरी लावलेली नाही, मात्र गेल्या आठवडाभरापासून वातावरण ढगाळ आहे.

शेतकऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा

अवकाळीचे ढग गडद झाल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे. रब्बी हंगामातील गहू, दादर, ज्वारी, हरभरा या पिकांचा हंगाम बऱ्यापैकी आटोपला आहे. मात्र, अनेकांच्या शेतात चारा पडून आहे. शिवाय अनेक ठिकाणी केळीदेखील कापणीवर आलेली आहे. अवकाळी पाऊस झाल्यास ही पिके अडचणीत येतील.