दिवाळीपूर्वी खड्डे बुजवा, अन्यथा अधिकार्‍यांना खड्ड्यांत झोपवू

शिवसेनेच्यावतीनं पालिका अधिकाऱ्यांना इशारा

Highway Patholes

अहमदनगर : नगर शहरातील रस्त्यांची विदारक व भयानक परिस्थिती झाली असून, शहर शिवसेनेच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांना घेराव घालण्यात आला व शहराच्या खड्ड्यांसंदर्भात जाब विचारण्यात आला. मात्र, सुधारणा होत नसल्याने आता शिवसेनेच्या वतीने दिवाळीपूर्वी हे खड्डे बुजवा, अन्यथा पालिका अधिकार्‍यांनाच या खड्ड्यांत झोपवू असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.

शहरातील अनेक संघटनेच्या वतीने निवेदने व आंदोलन झाले असूनदेखील कोणताही रस्ता पॅचिंग कामासाठी करण्यास प्रशासन तयार नाही. शहरातील काही दिवसांपूर्वीच खड्ड्याचे पॅचिंग काम केलेले आहे व ते संपूर्णपणे वाहून गेलेले आहे. ठेकेदार हा रस्त्याच्या खर्चावर आर्थिक भ्रष्टाचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. भुयारी गटार मार्गाचे काम चालू आहे. त्यामध्ये भुयारी गटार साठी खोदलेला रस्ता त्याला पॅकिंग करून बुजवणे त्यानंतर त्याचे बिल काढणे अशी निविदेत अट असतानाही कोट्यवधीचे बोगस पॅचिंगचे बिल काढण्यात आले. त्यामुळे नगर शहरातील खड्डे दिवाळीपूर्वी बुजवण्याची मागणी शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसुंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे शहर प्रमुख विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, परेश लोखंडे, दीपक खैरे, विजय पठारे, काका शेळके, अमोल येवले, संग्राम कोतकर, अभिषेक भोसले, तारीक कुरेशी, सागर शहाणे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते