काहीही करा, प्यायला पाणी द्या

माणिक ओझरच्या महिलांची आर्त हाक

राजूर तालुक्यातील माणिक ओझर येथील नळपाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून कार्यान्वित असताना गेली तीन महिन्यापासून ही योजना बंद असल्याने महिलांना तीन किलोमीटर पायी चालत डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. आज महिलांनी याबाबत सामाजिक कार्यकर्त्या हेमलता पिचड यांना लेखी निवेदन देऊन ‘काही करा आम्हाला पाणी द्या’ अशी विनंती केली.

माणिक ओझर, बलठन, गोंदुशी या तीन गावची ग्रुप ग्रामपंचायत असून या गावात महिला ग्रामसेवक आहे.या गावातील ग्रामस्थ नळ पाणी पट्टी देऊनही त्यांना पावती नाही याबाबत ग्रामसेवक उत्तरे देत नसल्याने ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना तक्रार करूनही यावर उपाय निघाला नाही उलट तीन महिन्यापासून नळ योजना बंद असल्याने महिलांना तीन किलोमीटर वरून पानी आणावे लागत असल्याची माहिती मंदा बाई साबळे यांनी दिली.यावेळी मीराबाई बोटे, झुंबराबाई तळपाडे, सुवर्णा साबळे, रवींद्र बोटे, देवराम साबळे व ५० ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले आहे.