गुटख्याची तस्करी : संगमनेरात दीड लाखांचा माल पकडला

शहर पोलिसांची कारवाई, कार जप्त, दोघांना अटक

Seized Gutkha

राज्यात गुटखा बंदी असतानाही संगमनेरमध्ये एका वाहनातून विक्रीसाठी येणारा १ लाख ५९ हजार २००रुपयांचा गुटखा आणि ओम्नी कार असा एकूण ४ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जमील खलील शेख (वय ३२) व खलील ताजमोहंमद शेख (वय ६२, रा. जोर्वे रोड, संगमनेर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघे नाशिकहून ओम्नी कार (एम. एच १७-व्ही ४९५३) मधून १ लाख २७ हजार २०० रुपयांचा हिरा पान मसाला, ३१ हजार ८०० रुपयांची रॉयल तंबाखू असा एकूण १ लाख ५९ हजार २०० रुपयांचा गुटखा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून घुलेवाडी शिवारात कार अडवून तपासणी केली. पोलिसांना दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर कारची पाहणी केली असता गुटखा, तंबाखू व कार असा एकूण ४ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल दिसून आला. पोलिसांनी कारसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन उगले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोघांना न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत आहेत.