शिर्डी : साईभक्त महिलांना अश्लील व्हिडिओ व मेसेज पाठवल्याबद्दल साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या राहाता तालुका संघटक स्वाती सुनील परदेशी यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे केली आहे. हा प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील एका अधिकाऱ्याने मुंबईसह आसाम येथील साईभक्त महिलांशी जवळीक करत नंतर मोबाईलवरून अश्लील चित्रफित व मेसेज पाठवले. यासंदर्भात या महिलांनी संस्थानकडे लेखी तक्रार केली असून. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्याची सखोल चौकशी व्हावी, असे परदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अहमदनगर, धर्मादाय आयुक्त तथा सदस्य तदर्थ समिती, साईबाबा संस्थान अहमदनगर, जिल्हाधिकारी अहमदनगर व जिल्हा पोलीस प्रमुख अहमदनगर यांना पाठवल्या आहेत.