खाणीतल्या विहिरीत पडून सख्ख्या भावांचा मृत्यू

कौठेकमळेश्वर येथील हृदयद्रावक घटना; गावावर पसरली शोककळा

Two brothers die after falling in mine

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात दगड खाणीतल्या विहिरीतील पाण्यात बुडून दोघा सख्ख्या चिमुकल्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. समाधान जालिंदर भडांगे (वय १२ वर्षे) व सुरेश जालिंदर भडांगे (वय १० वर्षे) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. शनिवारी (दि. २६) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या हृदयद्रावक दुर्दैवी घटनेने कौठेकमळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.

कौठेकमळेश्वर ते निळवंडे रस्त्यानजिकच्या खिंड शिवारात दगड खाण आहे. समाधान जालिंदर भडांगे व सुरेश जालिंदर भडांगे ही भावंडे शेळ्या पाणी पाजण्यासाठी खाणीकडे गेले होते. दरम्यान शेळी पाण्यात पडली, तिला वाचविण्यासाठी समाधान भडांगे हा पाण्यात उतरला असता तो पाण्यात बुडाला. भाऊ पाण्यात बुडाल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी सुरेश भडांगे हा चिमुकला पाण्यात उतरला असता दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोबत असलेल्या काही मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी कौठेकमळेश्वर गावात घटनेची माहिती दिली. त्यानंतर उपसरपंच नवनाथ जोंधळे यांसहित पदाधिकारी व ग्रामस्थांनी खाणीकडे धाव घेतली. घटनेची माहिती समजताच पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांनी घटनास्थळी जात माहिती घेत घटनेची खात्री केली व संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती दिली.

पदाधिकारी व ग्रामस्थांनी पाण्यातून दोघाही मुलांचे मृतदेह बाहेर काढले व घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविले. समाधान भडांगे हा पाचवीत, तर सुरेश भडांगे हा तिसरीत शिकत होता, असे सांगण्यात आले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहेत. दोघा चिमुकल्या भावंडांचा दुर्दैवी मूत्यू झाल्याने कौठेकमळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.