लसीकरण हाच आमच्यासाठी आहेर;दोन्ही डोस जरूर घ्या अन् लग्नाला या!

करहाळे कुटुंबियांनी छापली अनोखी लग्नपत्रिका

wedding

जळगाव : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका वाढत असताना शासन स्तरावरून नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावावा आणि शुभविवाहानिमित्त याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी जळगावच्या कर्‍हाळे कुटुंबियांनी आपल्या मुलीच्या लग्नपत्रिकेतून थेट लसीकरणाचा संदेश दिला आहे. तुमचं लसीकरण हाच आमच्यासाठी आहेर आहे. लसीचे दोन्ही डोस जरूर घ्या,’ असे त्यात म्हटले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील या उपक्रमाबद्दल केर्हाळे कुटुंबीयांचे कौतुक केले आहे.

जळगावचे रहिवासी अनिल कर्‍हाळे यांची कन्या निकिता हिचा विवाह ५ फेब्रुवारी रोजी होत आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याने शासनस्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, नागरिकांना लसीकरणाचे आवाहनदेखील केले जातेे आहे. कर्‍हाळे कुटुंबियांनी सामाजिक भान राखत शासनाच्या प्रयत्नांना आपल्या कार्याच्या माध्यमातून हातभार लागावा यासाठी मुलीच्या लग्नपत्रिकेतून लसीकरणाबाबत संदेश देत जनजागृती केली आहे. अनिल करहाळे यांची कन्या निकिता हिच्या संकल्पनेतून ही पत्रिका तयार झाली. तिची संकल्पना स्विकारत आई वडीलांनीही त्यास होकार दिला.

अशी आहे लग्नपत्रिका

पत्रिकेच्या डाव्या बाजूला विवाह सोहळ्यासंबंधी माहिती, वधूवरांची नावे, विवाहाचा दिवस, मुहूर्त स्थळ अशी माहिती आहे. पत्रिकेच्या सर्वात वरच्या बाजूला कोरोना संदेश देण्यात आला आहे. त्यात मास्क आणि सॅनिटायझरचा दैनंदिन वापर करा, सुरक्षित अंतर सवयीचा भाग बनवा, असे सचित्र व ठळक शब्दांत लिहिण्यात आले आहे. तर, पत्रिकेच्या सुरुवातीला ‘सर्टिफिकेट फॉर कोविड १९ व्हॅक्सिनेशन’ असे लिहिले आहे.

खालील बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र व बारकोड आहे. पत्रिकेच्या उजव्या बाजूला एक खास मजकूर आहे. ‘आपले सर्वांचे आयुष्य सर्वांनाच अधिक प्रिय आहे. तेव्हा सर्वांनी करोना प्रतिबंधक लसीकरण करा व काळजी घ्या. तुमचं लसीकरण हाच आमच्यासाठी आहेर आहे. लसीचे दोन्ही डोस जरूर घ्या,’ असे त्यात म्हटले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील या उपक्रमाबद्दल करहाळे कुटुंबियांचे कौतुक केले आहे.