भाईंदर :- मिरा- भाईंदर महापालिका अग्निशमन विभाग सक्षम झाला पाहिजे, यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अग्निशमन विभागासाठी खरेदी केलेल्या १६ फायर बाईकचे उद्घाटन करण्यात आले. मिरा- भाईंदर महापालिका अग्निशमन विभागाने ३५० सीसी क्षमतेचे इंजिन असलेल्या १६ फायर बाईक खरेदी करून अग्निशमन विभागाने सक्षमतेकडे एक पाऊल उचलले आहे. या फायर बाईकवर प्रत्येकी ३५ लिटरचा पाण्याचा साठा असणार आहे. बाईकवर वॉटर मिस्ट टेक्नॉलॉजी बसवण्यात आल्या असून या टेक्नॉलॉजी द्वारे हवा थंड करून आग विझवण्यात मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. बाईकवर नोझल गन सह २० मीटर लांबीच्या होज रील उपलब्ध आहे. तसेच जेटची लांबी ही १० मीटर लांब ठेवण्यात आली आहे. यामध्ये अतिउच्च दाब देण्यात आल्याने पंपाची वॉटर डिस्चार्ज कॅपॅसिटी ८ ते ९ लिटर प्रति मिनिट असणार आहे.
या फायर बाईकचा वापर हा लहान आणि प्राथमिक टप्प्यातील आग विझवण्यासाठी होणार आहे. तसेच या बाईकच्या मदतीने वर्दळीच्या आणि गल्लीबोळात घटनास्थळी वेळेत पोहोचणे शक्य होऊन अग्निशमन सेवा लवकर पुरवण्यात मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे, असे मत आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांनी व्यक्त केले. यावेळी अति. आयुक्त अनिकेत मानोरकर, अग्निशमन विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड, उपायुक्त कल्पिता पिंपळे, अग्निशमन विभाग अधिकारी प्रकाश बोराडे, महापालिका अधिकारी आणि अग्निशमन विभाग कर्मचारी उपस्थित होते.