घरपालघर१६३ वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई

१६३ वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई

Subscribe

यात १६३ ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे तर ११ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळून आले.

वसई : महावितरणच्या पालघर विभागीय कार्यालयाकडून वीज चोरांविरुध्द धडक कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसात बोईसर-ग्रामीण, सफाळे, तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, बोईसर (औद्योगिक) या उपविभागांमध्ये एकूण 1 हजार २४ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात १६३ ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे तर ११ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळून आले.

दोन दिवसांच्या धडक मोहिमेत सुमारे २५ लाख रुपये किंमतीची पावणे दोन लाख युनिट विजेची चोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकांना यश आले. वीज चोरीची अनुमानित वीज बिले संबंधित ग्राहकांना देण्यात आली असून या देयकासह दंडाची रक्कम विहित मुदतीत न भरणार्‍यांवर गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येणार आहे. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रताप माचिये, सर्व उपविभागीय अभियंते, सहाय्यक अभियंते ,जनमित्र, कर्मचारी, सुरक्षा रक्षक अशा १२५ जणांच्या पथकाने ही कारवाई केली. वीजचोरी शोध मोहीम यापुढे नियमितपणे राबवण्यात येणार असून आगामी काळात ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. वीज चोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये तसेच अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -