वसईः मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या योजनेतून महापालिकेसाठी १८५ एमएलडी पाणी काशिद कोपर येथील नवीन टाकीमधून लवकरच उपलब्ध होणार आहे. अमृत २.० अंतर्गत महापालिकेतील अस्तित्वातील योजना बळकटीकरण व विस्तारीकरण करण्यासाठी ४९४.११ कोटींची शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. नालासोपारा (पूर्व) येथील सांडपाणी प्रकल्पाच्या ४३१.२८ कोटींच्या डिपीआरला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली असून सदर काम लवकरच सुरु होत असल्याची माहिती महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली. महापालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांमार्फत राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र राज्यगीत गायन करण्यात आले व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. यावेळी आमदार क्षितीज ठाकूर,माजी महापौर राजीव पाटील आणि मान्यवर उपस्थित होते.राज्य सरकारने १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ७ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत. सध्यस्थितीत सर डी एम पेटीट रुग्णालय, तुळींज हॉस्पिटल व माता बाल रुग्णालय बोळींज येथे ओपीडी सुरु करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांच्या आवारात जेनेरिक मेडिकल स्टोअर सुरु करण्याचा मानस असल्याचेही पवार यांनी पुढे बोलताना सांगितले.
केंद्र शासनाच्या सेतू भारतम योजनेतून विराट नगर, ओस्वाल नगरी, अलकापुरी, उमेळमान व वसई रोड जुने पूल तोडून नव्याने पूल बांधण्याचा आणि शहरातील विविध २४ मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठीचाही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यांवर ८ ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिज बांधण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे, अशीही माहिती पवार यांनी दिली.
०००
१० डिसेंबरला मॅरेथॉन स्पर्धा
१० डिसेंबर २०२३ ला ११ व्या राष्ट्रीय स्तरीय वसई -विरार महापालिका मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धेसाठीची नोंदणी आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी पासून सुरु करण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी, खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन यावेळी पवार यांनी यावेळी केले.