भाईंदर :- मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयात मनुष्यबळाची कमतरता आहे.त्यामुळे पोलीस आयुक्तालयास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पुरविण्यात आलेल्या एकूण ५०० मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेकडून घेण्यास शासनाने ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णय नुसार मान्यता प्रदान केली होती. सदरील सुरक्षा रक्षकांच्या वेतनासाठी विधीमंडळाच्या डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीने मंजूर झालेले अनुदान उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद केलेली ११ कोटी ६९ लाख आणि पोलीस आयुक्तांनी अजून मागणी केलेली १४ कोटी ७२ लाख असे एकूण २६ कोटी ४१ लाख ९४ हजार रुपये अनुदान आयुक्तालयाला मंजूर करण्यात आले आहे.
आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत १५ जून २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी यापुढे मुदतवाढ न देण्याच्या अटीस अधिन राहून एकूण ५०० मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेकडून (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून) घेण्यास शासन निर्णया द्वारे ७ डिसेंबर २०२३ रोजी मान्यता प्रदान करण्यात आलेली होती. ठाणे ग्रामीण आणि पालघर घटकाचे विभाजन करून १ ऑक्टोबर २०२० रोजी मीरा -भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. यात एकूण १६ पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला असून ३ पोलीस ठाण्यांची निर्मिती अद्यापही प्रस्तावित आहे. सध्या स्थितीत पोलीस आयुक्तालयात १ हजार ७३५ पोलीस कर्मचारी आणि ३५८ पोलीस अधिकारी कार्यरत आहे. तर १ हजार ६४ पदे ही रिक्त होती. ती सुद्धा पोलिसांकडून भरण्यात आली आहेत. ते कर्मचारी सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. सदरील शासन आदेश हे गृह विभागाचे कक्ष अधिकारी प्रविण ढिकले यांनी जारी केले आहेत.