भाईंदर :- मीरा-भाईंदर शहरात वीजपुरवठा करणार्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने वीज चोरी करणार्यावर कारवाई केली. या कारवाईत एकूण १ लाख ७० हजार युनिटची वीजचोरी शोधून काढली आहे. या वीजचोरी केलेली थकीत रक्कम २९ लाख ६० हजार रुपये इतकी असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीकडून वीजचोरी करणार्या विरोधात केलेल्या कारवाईमध्ये शहरातील विविध पोलीस ठाण्यांत ४३ गुन्हे दाखल केले आहेत.
मीरा-भाईंदर शहरात वीजपुरवठा करणार्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाल्याने कंपनीने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या सहा महिन्यांत वीजचोरीची शोध मोहीम राबवली होती. या शोध मोहिमेत मीरारोडच्या नयानगरसह काशिमीरा, भाईंदर पूर्वेकडील नवघर व भाईंदर पोलीस ठाणे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचे कंपनीने नियुक्त केलेल्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी या क्षेत्रात वीजचोरीचा शोध घेत एकूण ४३ गुन्हे दाखल केले आहेत.
या वीजचोरीत एकूण १ लाख ७० हजार युनिटचा बेकायदेशीर वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले असून त्याची २९ लाख ६० हजार रुपये रक्कम थकीत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीची दक्षता व अंमलबजावणी पथके स्थानिक पोलिसांच्या मदतीने नियमितपणे सामूहिक छापे घालून वीजचोरी करणार्या गुन्हेगारांवर कारवाई करीत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.