एमएमआरडीएच्या पाणीपुरवठा योजनेतून 45 गावांना मिळणार शुद्ध पाणी

या गावांमध्ये पुरेशा प्रमाणात जल स्रोत उपलब्ध नसल्याने एमएमआरडीएच्या जलवाहिनीमधून जलजोडणीची मागणी जि.प.च्यावतीने एमएमआरडीएकडे करण्यात आली होती.

नाजिम खतीब, पालघर: जिल्ह्यातील महामार्गालगतच्या 45 गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनांना एमएमआरडीएच्या जलवाहिनीमधून जलजोडणी दिली जाणार आहे. थेट पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणी शुद्धीकरण आणि वीज बिलाच्या रकमेत बचत होऊन पाणीपुरवठा योजना अधिक सक्षमपणे कार्यरत राहणार आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत महामार्गालगतच्या 48 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील 76 गावांच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. या गावांमध्ये पुरेशा प्रमाणात जल स्रोत उपलब्ध नसल्याने एमएमआरडीएच्या जलवाहिनीमधून जलजोडणीची मागणी जि.प.च्यावतीने एमएमआरडीएकडे करण्यात आली होती.

केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जल जीवनमिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी अडचणी येत आहेत.जलस्रोत उपलब्ध नसलेल्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी एमएमआरडीएच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने एमएमआरडीएकडे करण्यात आली होती.
एमएमआरडीए राबवत असलेल्या सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर आहे. पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी पालघर जिल्ह्याच्या डहाणू, पालघर आणि वसई तालुक्याच्या पूर्वेकडील ग्रामीण भाग आणि वसई- विरार महानगर पालिका क्षेत्रातून जात आहे. योजनेची जलवाहिनी वसई,पालघर आणि डहाणू तालुक्यातील 76 गावांच्या हद्दितून जात असून या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शाश्वत आणि पुरेसा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.76 गावांची दररोजची पाण्याची मागणी 22.33 दशलक्ष लिटर असल्याचे सांगत 76 गावांना नळजोडणी देण्यासाठी सुमारे 25 दशलक्ष लिटर पाणी साठ्या सह जल जोडणी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने एमएमआरडीएकडे करण्यात आली.

एमएमआरडीएच्या सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पालघर जिल्ह्यातील गावांसाठी 15 दशलक्ष लिटर पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून 76 गावांसाठी 25 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता.परंतु एमएमआरडीए कडून 15 दशलक्ष लिटर च्या पाणी साठ्याअंतर्गत 45 गावांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.उर्वरित गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी स्थानिक स्तरावर पाण्याचे स्रोत वापरले जाणार आहेत.
– भानुदास पालवे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर.

15 दशलक्ष लिटर पाणी साठ्या अंतर्गत 45 गावांना जल जोडणीसाठी मंजुरी दिली आहे.अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध झाल्यास उर्वरित गावांसाठी जल जोडणी देण्यात येईल.
– हनुमंत सोनावणे,
कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए.