पालघर: पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातील किनारा क्षेत्रासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (मेरिटाईम) तब्बल पाच ते सहा कोटीच्या जवळपासचा भरघोस निधी दिला आहे. किनारा क्षेत्रात अनेक महत्वाची मोठी कामे मंजूर झाली आहेत. कामांमध्ये प्रवासी जेट्टी बांधणे व दुरुस्ती करणे, पोच रस्ता, जोडरस्ता दुरुस्ती व तयार करणे तसेच उतरते धक्के आणि धूपप्रतिबंधक संरक्षक भिंती बांधण्याच्या विविध आठ कामांसाठी मंडळामार्फत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
समुद्रकिनारी धूप होत असल्याने कळंब व डहाणू तालुक्यात नरपड गाव किनार्याच्या घरामध्ये समुद्राचे पाणी जाऊन दरवर्षी नागरिकांचे नेहमी नुकसान होत असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी समोर आली. त्यानुसार वसई तालुक्यातील कळंब व डहाणू तालुक्यातील नरपड येथे किनार्याची धूप थांबवण्यासाठी संरक्षक भिंतींचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. समुद्रामध्ये मासेमारीला जाण्यासाठी उतरते धक्के नसल्याने मच्छीमारांना बोटी नांगरणे व किनारी मासे आणणे अवघड जात आहे. हे लक्षात घेऊन वसई व पालघर तालुक्यात आवश्यक ठिकाणी उतरते धक्के (रॅम्प) बांधण्यात येणार आहेत. यामुळे मच्छीमारांना मासेमारीला जाणे व इतर कामे आणखी सुलभ व सोयीचे होतील.
पालघर तालुक्यामध्ये पारगाव नदीपात्र परिसरामध्ये बंदरावर जाण्यासाठी रस्ता अस्तित्वात असला तरी त्याची दयनीय अवस्था लक्षात घेता पारगाव खाडी बंदराकडे जाणारा रस्ता तयार करण्याची तरतूद महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहे.
तिन्ही तालुक्यांतील किनारा भागात सागरी मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या क्षेत्रांमध्ये प्राधान्य क्रमाने आठ कामे निवडण्यात आली असून या आठही कामांच्या दुरुस्तीसाठी व काही कामांच्या नव्याने बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर सागरी मंडळामार्फत पाच ते सहा कोटीच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेमध्ये ठेकेदारांनी भाग घेतल्यानंतर नियमानुसार पुढील प्रक्रिया पार पडेल व येत्या दोन-चार महिन्यांत ही कामे सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही सर्व कामे एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करणे ठेकेदारांवर बंधनकारक राहणार आहे.
मंजूर झालेली कामे:
पालघर तालुक्यातील कांदरवन येथे प्रवाशी जेट्टी व पोचरस्ता दुरुस्त करणे
रक्कम 78,24,635
पालघर तालुक्यातील कांद्रेभुरे येथील जेट्टी व पोहोच रस्त्याची दुरुस्ती करणे.
रक्कम 72,76,245
पालघर तालुक्यातील पारगांव खाडी बंदराकडे जाणारा रस्ता तयार करणे
रक्कम 51,05,067
पालघर तालुक्यातील वैतीपाडा येथील अस्तित्वातील प्रवाशी जेट्टी व जेट्टीला जोडरस्ता दुरुस्ती.
रक्कम 97,76,419
पालघर तालुक्यातील कोरे येथे उतरता धक्का बांधणे.
रक्कम 97,48,635
वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ला येथे तीन उतरते धक्के (रॅम्प) बांधणे
रक्कम 96,93,856
वसई तालुक्यातील कळंब किनारी धूप प्रतिबंधक संरक्षण भिंत व पोचरस्ता तयार करणे.
रक्कम 43,48,424
तालुक्यातील नरपड किनारी धूप प्रतिबंधक संरक्षण भिंत बांधणे.
रक्कम 42,97,552
चौकट:
पालघर जिल्हा स्थापनेपासून जिल्ह्यात सागरी मंडळाचे कार्यालय नव्हते. मात्र आता कोळगाव प्रशासकीय इमारतीत मंडळाचे विभागीय कार्यालय आल्याने जिल्ह्याचा सागरी क्षेत्राचा कारभार येथून पाहता येणे शक्य झाले आहे.