आदिवासी महिलेचे ६० हजार लुबाडले

नोटा मोजत असताना एका भामट्याने त्यातील चार नोटा तिला देऊन या खोट्या असल्याचे सांगत कॅशियरकडे जाण्यास सांगितले.

विक्रमगडः बँकेतून दोन लाख रुपये काढलेल्या एका आदिवासी महिलेच्या मागावर असलेल्या दोन भामट्यांनी पैसे मोजून देतो, अशी बतावणी करून त्यातील साठ हजार रुपये लुबाडून पलायन केल्याची घटना विक्रमगडमध्ये घडली आहे. याप्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रमगड तालुक्यातील वसुरी येथे राहणार्‍या काशि काशिनाथ गावित (५५) ही महिला भोपोली आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून काम करते. बुधवारी ती विक्रमगड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेली होती. दोन लाख रुपये काढल्यानंतर अशिक्षित असल्याने ते मोजायचे कसे याचा ती विचार करत होती. त्यावेळी तिच्या मागावर असलेल्या दोन भामट्यांनी तिच्याशी गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पैसे मोजून देण्याची बतावणी त्यांनी केली. नोटा मोजत असताना एका भामट्याने त्यातील चार नोटा तिला देऊन या खोट्या असल्याचे सांगत कॅशियरकडे जाण्यास सांगितले.

कॅशियरने नोटा खर्‍या असल्याचे सांगितल्यानंतर काशि पुन्हा आली. तोपर्यंत भामट्यांनी त्यातील साठ हजार रुपये काढून घेतले होते. काशि गावितने रात्री घरी नोटा मोजल्या असता त्यात साठ हजार रुपये कमी असल्याचे आढळून आले. दुसर्‍यादिवशी तिने बँकेत जाऊन पैसे कमी असल्याचे सांगितले. तेव्हा बँक कर्मचार्‍यांनी बँकेतील सीसीटीव्ही तपासले तेव्हा दोन भामट्यांनी साठ हजार रुपये चोरल्याचे दिसून आले. याप्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये भामटे स्कुटीवरून पाटीलपाडाकडे गेल्याचे दिसून आले आहे.