घरपालघरविधवा आदिवासी महिलेची नुकसानभरपाईसाठी ७ महिने वणवण

विधवा आदिवासी महिलेची नुकसानभरपाईसाठी ७ महिने वणवण

Subscribe

मुलगी आजारी असताना तिच्या उपचारासाठी नदीच्या पलीकडील नातेवाईकांकडे पैसे आणण्यासाठी भर पावसात गेलेल्या आदिवासी इसमाचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला होता.

मुलगी आजारी असताना तिच्या उपचारासाठी नदीच्या पलीकडील नातेवाईकांकडे पैसे आणण्यासाठी भर पावसात गेलेल्या आदिवासी इसमाचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. या घटनेला ७ महिने होऊन देखील कुटुंबाला शासनाकडून नुकसानभरपाई न मिळाल्याने विधवा बाईसह तिच्या ३ मुलांची फरफट होत आहे. डहाणू तालुक्यातील बापुगाव येथील तुळशीराम लखमा भावर हे गेल्या वर्षी २३ सप्टेंबर २०२१ रोजी घरात मुलगी तापाने फणफणली असल्याने तिला कासा येथील दवाखान्यात दाखल करण्यासाठी हाती पैसे नसल्याने धरमपूर येथील आपल्या नातेवाईंकाकडे संध्याकाळच्या सुमारास पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी वावी नदीवरील बंधारा ओलांडत असताना भिंतीवरून पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. २३ सप्टेंबरच्या आधी दोन-तीन दिवस धरमपूरच्या वरील भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वावी नदीला पूर आला होता.

नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना महाराष्ट्र सरकारकडून तातडीने ४ लाख रुपयांची मदत दिली जाते. बापुगाव येथील तुळशीराम भावर यांचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याने त्यांच्या पत्नी जया तुळशीराम भावर यांनी डहाणूचे तहसीलदार यांच्याकडे मदतीसाठी अर्ज केला होता. अर्जासोबत त्यांनी कासा पोलीस स्टेशन यांचा पंचनामा आणि रुग्णालयाचे प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून देखील त्यांना गेल्या ७ महिन्यांपासून एका कार्यालयाकडून दुसर्या कार्यालयाकडे पाठवण्याची फक्त टोलवाटोलवी केली जात असून मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप जया भावर यांनी केला आहे. जया भावर या विधवा असून त्यांना शाळेत शिक्षण घेणारी ३ मुलं आहेत. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची झाली असून पदरी असलेल्या ३ मुलांना पुढील शिक्षण द्यायचे तरी कसे, या विवंचनेत त्या सापडल्या आहेत. आपल्या पतीच्या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला असून त्यासाठी सरकारकडून देण्यात येणारी ४ लाखांची मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी जया तुळशीराम भावर यांनी डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

राणा दाम्पत्यामुळे ‘त्या’ इमारतीमधील ८ रहिवाशांनाही पालिकेची नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -