मिरारोडमध्ये कत्तलीसाठी म्हशींच्या ९ रेडकांना पोत्यातून वाहतूक

काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीत एका गाडीतून पोत्यात बांधून म्हशींच्या ९ रेडकांना कत्तलीसाठी घेऊन जाताना काशीमिरा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीत एका गाडीतून पोत्यात बांधून म्हशींच्या ९ रेडकांना कत्तलीसाठी घेऊन जाताना काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल चव्हाण यांनी दोन जणांना अटक केली आहे. तर याची माहिती मिळताच महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी विक्रम निराटले यांनी जाऊन त्या रेडकांना ताब्यात घेत त्यांना इंजेक्शन देऊन त्यांच्यावर उपचार करत ते कोंडवाड्यात पाठवले आहे.

काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीत रविवारी सकाळी चारचाकी मिनी टेम्पो मधून म्हशींची लहान ९ रेडके घेऊन जाताना पोलिसांना दोन इसम आढळले. ते वाहन अडवून त्यात चौकशी केली असता ती वासरे मीरारोडच्या नयानगर भागात ते कत्तलीसाठी पोत्यात बांधून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मिनी टेम्पो चालक व अन्य एका इसमाला ताब्यात घेऊन ती लहान रेडके पशु वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिली. ती वासरे पालिकेच्या कोंडवाड्यात नेऊन त्या वासरावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर विरार येथील नागपुडा प्राण्यांच्या गौ-शाळेमध्ये पाठवण्यात आल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी विक्रम निराटले यांनी सांगितले. परंतु ही लहान वासरे अत्यंत निर्दयीपणे मारण्याच्या उद्देशाने ती टेम्पोत टाकून आणली होती. त्यातील काही रेडकांची परिस्थिती अत्यंत खराब होती. त्यातील किती रेडके जगतील हे सांगता येत नाही, असेही पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम निराटले यांनी सांगितले. तर परिसरात कुत्रा, मांजर यांच्यासह गाई, म्हशी या प्राण्यांचा देखील अमानुष छळ करून त्यांची हत्या केली जाते. या प्राण्याकडे देखील प्राणीप्रेमी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे निराटले यांनी सांगितले.

तसेच अशी अनेक वासरे ही वसई, विरार व काशीमिरा येथील आजूबाजूच्या परिसरातून दररोज मीरारोड भागात रात्रीची घेऊन जात असल्याचे काही नागरिक सांगत आहेत. ही म्हशींची ९ वासरे वसई येथून आणली असून ती मिरारोड येथे घेऊन जाणार्‍या २ इसमाला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर काशीमिरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ३, ९, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही रेडके कोठून आणली, तसेच यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे. याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल चव्हाण पोलीस हे करत आहेत.

हेही वाचा – 

राज ठाकरेंची पुढच्या आठवड्यात पुण्यात सभा, उद्या 12 वाजता करणार घोषणा