घरपालघरअपहारप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

अपहारप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण सोसायटीत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन लेखापरिक्षकांचा समावेश आहे.

विरार : विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण सोसायटीत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन लेखापरिक्षकांचा समावेश आहे.
त्रिमूर्ती गृहनिर्माण सोसायटीमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी संस्थेतील सदस्य तथा शिवसेनेचे विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सहकारी संस्था वसई येथील लेखापरिक्षक वैभव ठसाळे यांच्या फिर्यादीवरून स्मृती किनळेकर,प्रवीण चाळके,सचिन भालेराव,अमित दर्जी,कार्तिक महाराज,नागेश विस्पुते,बी.एन, शिंदे, भीमराव तांबे यांच्याविरोधात कलम ४०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरलेखापरिक्षणामध्ये मे २०१७ मध्ये विरार पूर्वेकडील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण सोसायटीची कमिटी वसई येथील निबंधकाच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर एक वर्षापर्यंत कोणतीही कमिटी नेमण्यात आली नव्हती किंवा प्राधिकृत अधिकारी ही नेमलेले नव्हते. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये सुनिल माईनकर यांची प्राधिकृत अधिकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु सुनिल माईनकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे जागी भीमराव तांबे यांची ऑगस्ट २०१८ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान सोसायटीमधील सदस्य विनायक भोसले यांनी भीमराव तांबे हे काम व्यवस्थित करत नसल्याबाबत निबंधक वसई यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी भोसले यांच्या तक्रारीची दखल घेत निबंधक वसई यांनी भीमराव तांबे यांच्या जागेवर विद्यमान प्रशासक रविकांत सावंत यांची डिसेंबर २०१९ मध्ये नेमणूक केली. निबंधक वसई यांनी लेखापरीक्षक ठसाळे यांना सदर सोसायटीचे फेरलेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोसायटीचे फेरलेखापरीक्षण केले असता मे २०१७ ते एप्रिल २०१८ पर्यत सदर सोसायटीवर कोणतीही कमिटी अथवा प्राधिकृत अधिकारी हे नेमलेले नसताना निबंधक वसई यांची कोणतीही परवानगी न घेता कमिटी स्थापन करून सोसायटीचे कामकाज चालू ठेवल्याचे निदर्शनास आले.
प्रशासकीय अधिकारी भीमराव तांबे यांच्या कार्यकाळातील फेरलेखापरिक्षणात तांबे खर्चाचा खुलासा करू शकले नाहीत. तसेच तत्कालीन तांबे यांनी त्यांचे ऑगस्ट-२०१८ ते डिसेंबर-२०१९ या कार्यकाळात एकूण साडे सहा हजार रुपयांचा अपहार केला. तसेच स्वयंघोषित कमिटीने एक लाख ३७७ रूपयांचा परस्पर अपहार झाल्याची बाब फेर लेखापरिक्षणात उघड झाली. विशेष म्हणजे ठसाळे यांनी लेखापरीक्षण करण्याअगोदर बी. एल.शिंदे यांनी सन २०१७ ते २०२० मध्ये केले होते आणि ते चुकीचे असल्याची बाब समोर आली. त्यानंतर ठसाळे यांच्या तक्रारीवरून बी.एन, शिंदे, भीमराव तांबे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -