Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर पालघर पाणी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल होणार

पाणी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल होणार

Subscribe

या तक्रारीनंतर आयुक्त अनिलकुमार पवार यांनी जलवाहिनी खंडित करण्यासोबत ही चोरी करण्यास प्रोत्साहन देणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

वसईः वसई -विरार महापालिकेने पाणी चोरांविरोधात धडक कारवाई सुरु केली असून विरारमधील भारती अपार्टमेंटमध्ये होत असलेली पाणी चोरी उजेडात आल्यानंतर पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तसेच या सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. विरार पूर्वेकडील मनवेलपाडा भागात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असताना या भागातील दत्त मंदिरजवळील भारती अपार्टमेंटमध्ये पाणीचोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या इमारतीला दोन कनेक्शन असून या दोन्ही कनेक्शनना मोटर लावण्यात येत असल्याने परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार होती. ही कल्पना वॉलमन व इंजिनिअरला असतानाही कारवाई होत नसल्याने मनवेल पाडा-गावातील ग्रामस्थांनी रविवारी सकाळी ही पाणी चोरी रंगेहाथ पकडली.
या तक्रारीनंतर आयुक्त अनिलकुमार पवार यांनी जलवाहिनी खंडित करण्यासोबत ही चोरी करण्यास प्रोत्साहन देणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मंगळवारी महापालिकेच्या पथकाने पाणी चोरीसाठी वापरण्यात येणार्‍या दोन मोटारी जप्त केल्या आहेत. तसेच सोसायटीचा पाणीपुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. आता पाणी चोरीप्रकरणी सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवरच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. शहरात पाणी चोरीचे प्रमाण वाढल्याने अनधिकृत नळजोडणींची पाहणी करून या जलवाहिनी खंडित करण्यासाठी वसई-विरार महापालिकेने मागील वर्षी मुख्यालय स्तरावर निर्मिती केलेले ‘दक्षता पथक’ विसर्जित करण्यात आल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे. त्याऐवजी २५ अधिकारी-कर्मचार्‍यांच्या नव्या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकात प्रभागनिहाय चार ते पाच कर्मचारी असणार असून, अनधिकृत नळजोडणी शोधून त्या खंडित करण्याची जबाबदारी या पथकावर असणार आहे. शहरात आजघडीला 1 हजार २७० अनधिकृत नळ जोडणी असल्याची माहिती महापालिकेने दिली असली तरी प्रत्यक्षात ही संख्या त्याहीपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. शहरात पाण्याची वाढती मागणी असून, महापालिकेच्या नऊही प्रभागांत एकूण 60,796 नळजोडणी अस्तित्वात आहेत. यात 59,077 इतक्या रहिवासी, तर 1719 वाणिज्य/संस्था नळजोडणी आहेत. शहरात सातत्याने कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि जलवाहिन्यांवर होणारी पाणीगळती यामुळे नागरिकांना आजही पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरात पाणी चोरीचे प्रमाण वाढल्याच्याही तक्रारी आहेत. मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ जोडण्या घेण्यात येत असल्याने अधिकृत नळ जोडणीधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

पथकाकडून अद्याप एकही कारवाई नाही

नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेने अनधिकृत जोडणी खंडित करण्यासाठी नोव्हेंबर 2022 अखेर ‘दक्षता पथक’ तयार केले होते.विशेष म्हणजे अशा प्रकारे अनधिकृत नळ जोडण्यांद्वारे पाणी चोरणार्‍यांची यादी बनवून पोलीस ठाण्यात सादर करण्यात येणार होती. प्रत्यक्षात मात्र या पथकाने आजपर्यंत किती जणांवर कारवाई केली व गुन्हे दाखल केले, याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. त्याऐवजी आता वसई-विरार महापालिकेने नव्याने या कामासाठी पथक तयार केले असले तरी पथकाकडून अद्याप एकही कारवाई करण्यात आलेली नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -