बोईसरमध्ये क्रिकेटच्या वादातून दे दणादण

बोईसर पालघर रस्त्यावरील खैरापाडा मैदान येथे क्रिकेट सामने खेळताना खेळाडूंच्या दोन गटांत वाद झाला होता.

सचिन पाटील, बोईसर : बोईसरजवळील खैरापाडा मैदानात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान दोन गटांत वाद निर्माण होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले होते. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोन्ही गटांतील आरोपींना ताब्यात घेत तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. बोईसर पालघर रस्त्यावरील खैरापाडा मैदान येथे क्रिकेट सामने खेळताना खेळाडूंच्या दोन गटांत वाद झाला होता.

याच वादाचा राग मनात धरून काल संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास खैरापाडा उड्डाणपुलाजवळील अधिकारी प्रोजेक्टसच्या कार्यालयासमोर शेरू खान व सरताज खान यांची महेश धोडी व साहील धोडी या दुसर्‍या गटासोबत पुन्हा बाचाबाची, शिवीगाळ करीत हाणामारी झाली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या रशिद चौधरी याला देखील मारहाण करून जखमी केल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.तर महेश धोडी याने देखील आपल्यावर चाकूचे वार करून जखमी केल्याची परस्परविरोधी तक्रार बोईसर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.दोन गटांत झालेल्या या हाणामारीमुळे शहरात काही काळ अफवा पसरून वातावरण तंग झाले होते. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी आपल्या सहकार्‍यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व आरोपींना ताब्यात घेत हाणामारीत जखमी झालेल्या आरोपींना रुग्णालयात दाखल केले. तसेच सर्वांवर भादंवि कलम ३२४,३२३,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या या हाणामारी प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी आपल्या सहकारी पोलिसांसह तातडीने कारवाई करीत आरोपींना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली.