Eco friendly bappa Competition
घर पालघर एक दिवसाचा कार्यक्रम केला,मैदानाचाच खेळ झाला

एक दिवसाचा कार्यक्रम केला,मैदानाचाच खेळ झाला

Subscribe

मान्यवरांच्या सुविधेसाठी या मैदानात दगड,कपची,ग्रीट व डांबराचा मारा केल्याने पंचक्रोशीतील एक महत्त्वपूर्ण मैदान खेळाच्या वापरासाठी यापुढे कुचकामी ठरणार आहे.

जव्हारः जव्हार येथे  जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमासाठी जव्हारमधील एकमेव भारतरत्न राजीव गांधी मैदानाची वाताहात करण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी समाजातीला होतकरु क्रीडांपटूंमध्ये नाराजीचा सूर आहे.या कार्यक्रमासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला असून क्रीडांगणाची पार दैना करून टाकण्यात आली आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावरील कार्यक्रम ९ ऑगस्टला जव्हार येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार या उपस्थित राहणार होते. मात्र ढगाळ वातावरणामुळे त्यांचा दौरा रद्द झाला.हा कार्यक्रम पालघर जिल्ह्यातील एक नंबरचे मैदान म्हणून समजल्या जाणार्‍या जव्हार नगरपरिषदेचे मालकीच्या भारतरत्न राजीव गांधी मैदानात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी १९९७ पासून वापरात असलेल्या भव्य क्रीडांगणाची दयनीय अवस्था केली आहे. मान्यवरांच्या सुविधेसाठी या मैदानात दगड,कपची,ग्रीट व डांबराचा मारा केल्याने पंचक्रोशीतील एक महत्त्वपूर्ण मैदान खेळाच्या वापरासाठी यापुढे कुचकामी ठरणार आहे.

जागतिक आदिवासी दिनासाठी मैदानात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. सुमारे दहा हजार नागरिक बसतील इतका भव्य’वॉटरप्रूफ मंडपही उभारण्यात आला होता. या व्यासपीठ व सभा मंडपाच्या उभारणीदरम्यान क्रीडांगणाच्या मध्यभागी असलेली क्रिकेटची खेळपट्टी पार उखडली गेली असून मैदानात ठिकठिकाणी दगडाच्या राशी पडल्या आहेत.
व्यासपीठापर्यंत मान्यवरांचे वाहन जावे यासाठी सुमारे दीड फूट दगडाचा भराव करून त्यावर लहान दगड,कपची व दगडाची भुकटी (ग्रीट) टाकून त्याच्यावर डांबराचा थर टाकण्यात आला होता. याशिवाय सभा मंडपाच्या ठिकाणी खुर्च्या व्यवस्थित बसाव्यात,यासाठी खाली प्लाउड टाकण्यात आले होते.मैदानावरील डांबरी रस्ता बुलडोझरने काढण्याचा प्रयत्न काढण्यात आला. त्यानेही अधिक मैदानाची दुरवस्था झाली आहे.

- Advertisement -

कार्यक्रम दुसर्‍या ठिकाणी घेतला जाऊ शकला असता. मात्र अधिकार्‍यांनी नियोजन न केल्याने व मैदानाची दुरवस्था होईल याचा विचार न केल्याने आदिवासी भागातील प्रमुख मैदान यापुढे कुचकामी ठरणार आहे.या कार्यक्रमासाठी दोन कोटी अधिक खर्च झाल्याचे म्हटले जाते. अधिकार्‍यांच्या नियोजनाअभावी राज्य सरकारची अब्रू जनमानसात मलिन होत आहे. गावातील क्रीडाप्रेमींनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मैदान तातडीने पूर्ववत करण्यात यावे. दुरुस्ती न केल्यास विविध मार्गांनी आंदोलने केले जातील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पारस सहाणे यांनी दिला आहे.

०००
इतर पर्यायी जागा उपलब्ध असताना देखील प्रशासनाने चांगल्या मैदानाची दुरवस्था करून टाकली आहे. खेलो इंडिया म्हणणार्‍या सरकारने तातडीने या मैदानाची दुरुस्ती करावी. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. दुरुस्ती न केल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
—अ‍ॅड. पारस सहाणे,सामाजिक कार्यकर्ते

- Advertisement -

०००
पालघर जिल्ह्यातील प्रमुख मैदान असलेल्या राजीव गांधी स्टेडियमची अवस्था पाहून दुःख वाटते. यापुढे खेळाडूंनी सराव कुठे करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर मैदानाची दुरुस्ती करावी अशी मागणी आहे.
— नरेश महाले, खेळाडू,जव्हार

- Advertisment -