कुणाल लाडे, डहाणू : डहाणूच्या महसूल विभागाने डहाणू- चारोटी रस्त्यावर गौण खनिज वाहतूक करणार्या वाहनांच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. दिवसभरात वाहन तपासणी सत्रात अधिकार्यांनी सुमारे एक लाख रुपये दंड वसूल केला आहे. सध्या डहाणू तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूम माती व गौण खनिजांची वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांमार्फत अतिभाराने वाहतूक केली जात असल्याने स्थानिक रस्ते दुरवस्थेत सापडत आहेत, अशा वेळी या प्रकाराला लगाम लागावा यासाठी डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी अशा वाहनांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमून कारवाई सुरू केली आहे. संशय असलेल्या अतिभाराच्या १३ ते १४ वाहनांची तपासणी नेमलेल्या पथकामार्फत करून त्यामध्ये अधिभार घेऊन जाणार्या वाहनांना 1 लाख १४ हजार ३५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
गौण खनिज वाहतूक करताना वाहतूक करणारे वाहनचालक नियमांना बगल देत आहेत. परवानगीपेक्षा जास्त वजन गाडीत भरणे, विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन केले जात आहेत. त्यामुळे डहाणू महसूल विभागाने स्वतंत्र असे पथक नेमत गौण खनिज वाहतूक करणार्या वाहनांची परवानग्या, अतिभारित वाहन, गौण खनिज उत्खनन परवानगी अशा विविध बाबी तपासून सुरुवात केली. यामुळे नियमबाह्य गौण खनिज वाहतूक करणार्या वाहनचालकांचे मात्र आता धाबे दणाणले असून प्रशासनाने ही कारवाई अधिक कठोर करण्याचे ठरवले आहे.