सामाजिक एकोप्याची शंभर वर्षांची परंपरा

अशी माहिती सध्या याठिकाणी रोज पूजा अर्चा करणारे म्हात्रे कुटुंबातील पाचव्या पिढीतील दत्तात्रय जनार्धन म्हात्रे यांनी दिली.

वसई : एकीककडे धर्माधर्मात अविश्वासाचे वातावरण पसरले असतानाच वसईत मात्र गेल्या शंभर वर्षांपासून सामाजिक एकोपा जपणारा पीर बाबांचा उरुस यंदाही जल्लोषात साजरा करण्यात आला. वसईतील पापडी गावात शंभर वर्षांपासून नवनाथांचे शिष्य असलेल्या पीर बाबांचा उरुस हिंदू बांधव जल्लोषात साजरा करतात. पापडी येथील भंडार आळीत सतकोजी पीर बांबाची कबर आहे. याठिकाणी शंभर वर्षांपासून म्हात्रे कुटुंब त्या कबरीची रोज पूजा करून चादर चढवत आले आहेत. सतकोजी पीर हे नवनाथांचे शिष्य असल्याची आख्यायिका याठिकाणी सांगितली जाते. या कबरीवर मुस्लीम बांधवांसोबतच हिंदू त्याठिकाणी श्रद्धेने नतमस्तक होताना दिसतात, अशी माहिती सध्या याठिकाणी रोज पूजा अर्चा करणारे म्हात्रे कुटुंबातील पाचव्या पिढीतील दत्तात्रय जनार्धन म्हात्रे यांनी दिली.

पूर्वी वसईमध्ये ताबूत काढले जात होते. त्यांच्यापैकी काहीजण या कबरीवर चादर चढवायला यायचे. परंतु आता मात्र कोणी येत नाही. येथील जवळपास ३०० ते ४०० हिंदू वैशाख पौर्णिमेला या पीर बाबांचा मोठा उरूस साजरा करतात. त्यावेळी पूजा करून चादर चढवली जाते. धूप अगरबत्ती लावली जाते. या दिवशी प्रसाद म्हणून बुंदी,केशरी भट, शिरा आणि येणार्‍यांना भंडारा देण्यात येतो असे म्हात्रे यांनी सांगितले. आमच्या हस्ते एका मुसलमान पीर बाबाची सेवा होते. त्याचा आम्हाला गर्व आहे, असेही त्यांनी सांगितले. देशात राज्यात आतापर्यंत भरपूर दंगली झाल्या असतील. सामाजिक एकोप्यामुळे त्याची झळ वसईला कधीच लागलेली नाही,असे त्यांनी सांगितले.