घरपालघरनायजेरियात जहाजावर अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईचा संघर्ष

नायजेरियात जहाजावर अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईचा संघर्ष

Subscribe

याच मागणीसाठी संपदा शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे.

वसई : नायजेरिया येथे एमटी हेरॉइक या तेलवाहू जहाजावर १६ भारतीयांसह बंदी करून ठेवण्यात आलेल्या आपल्या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी, याकरिता संपदा शिंदे ही आई मागील काही दिवस केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि प्रसार माध्यमांचे उंबरठे झिजवत आहे. सगळ्यांनी मिळून आपल्या मुलाच्या सुटकेकरिता प्रयत्न करावेत, अशी याचना त्यांनी सर्वांना केली आहे. याच मागणीसाठी संपदा शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. विरार पूर्वेकडील मनवेल पाडा येथील वेदश्री सोसायटीत राहणार्‍या संपदा शिंदे यांचा मुलगा प्रणव संतोष शिंदे हा ओएसएम फिल्ट मॅनेजमेंट या शिपिंग कंपनीत शेफ म्हणून नोकरी करतो. चेन्नईस्थित ही कंपनी नायजेरिया येथे क्रूड ऑइल काढणार्‍या जहाजाला सेवा देत आहे. प्रणव १८ जुलै रोजी या कंपनीत कामाला लागला होता. ९ ऑगस्टपासून हे जहाज नायजेरियातील इक्वेटोरियोल गिनीमध्ये आहे. याठिकाणी बेकायदेशीर क्रूड ऑइल उचलले म्हणून हे जहाज नायजेरियामध्ये नजरकैदेत आहे.

या जहाजावर एकूण २६ सिफेअर्स आहेत. त्यात १६ भारतीयांचा समावेश असून त्यात प्रणव हा विरारचा आहे. त्यांना नायजेरियातील मेलाबो येथे ताब्यात घेण्यात आले आहे. गेले तीन महिने या सिफेअर्ससोबत गैरव्यवहार करण्यात येत आहेत. त्यांना अन्नपाणी दिले जात नाही. त्यांच्याकडील संपर्काची साधनेही काढून घेण्यात आलेली आहेत. प्रणवने आपल्याला ही माहिती आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून दिल्याची संपदा शिंदे यांनी दिली आहे.
एकाच खोलीत जमिनीवर या सगळ्यांना बसवून ठेवलेले असून त्यांची स्थिती बिकट आहे. यातील अनेकजण यामुळे आजारी पडलेले आहेत. त्यांच्यावर औषधोपचारही केले जात नाहीत. जहाज मालकाने दंड भरल्यानंतरही त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई कमी करण्यात आलेली नाही. नवी मुंबईतील ऑल इंडिया सिफेरस युनियनने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिपिंग मंत्री सरबानंद सोनिवाल यांना पत्र लिहून या भारतीयांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी विनंती केली आहे. दरम्यान, विरार येथे राहणार्‍या संपदा शिंदे यादेखील आपल्या मुलाच्या काळजीने स्थानिक नेते, मुख्यमंत्री आणि प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्याने त्यांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -