वसईः वाढवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यावरणपूरक बंदर बनवण्यात येणार असून ते जगातील पाचवे क्रमांकाचे असणार आहे. बंदरात याठिकाणी कच्च्या तेलाची वाहतूक केली जाणार नाही. एका सक्षम यंत्रणेच्या देखरेखीखाली बंदराचे कामकाज होणार असून ब्ल्यू प्रिंटही प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना दिली.वाढवण बंदरासंबंधी माहिती देण्यासाठी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी आणि उपाध्यक्ष उन्मेश वाघ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते. वाढवण बंदर ग्रीन पोर्ट असल्याचा दावा यावेळी संजय सेठी यांनी केला. वाढवण बंदराच्या विकासाला पर्यावरण, हवामान, वन मंत्रालयाकडून ना हरकत पर्यावरण मंजूरी आणि अन्य आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर आणि प्राथमिक कामे पूर्ण केल्यानंतरच बंदराच्या विकासकार्याला खर्या अर्थाने सुरुवात होईल, असेही सेठी यांनी सांगितले. त्याआधी जनसुनावणी घेऊन लोकांच्या तक्रारी आणि सूचना ऐकून त्यात आवश्यकेनुसार फेरबदल करून वाढवण बंदराचे काम केले जाईल, अशी ग्वाहीही सेठी यांनी यावेळी दिली.
जागतिक दर्जाची जहाजे थेट भारतात येऊ शकत नाही. सिंगापूर येथून लहान जहाजांमधून भारतात मालवाहतूक केली जात असल्याने अतिशय खर्चिक बाब आहे. वाढवण येथे जागतिक दर्जाची मालवाहतूक करणारी जहाजे सहजपणे येऊ शकत असल्याने भौगोलिक वैशिष्ठ्यामुळेच वाढवण किनार्याची बंदरासाठी निवड करण्यात आली आहे. जागतिक दर्जाची दहा बंदरे असून एकट्या चीनमध्ये सात बंदरे आहेत. त्यामुळे चीनची आर्थिक प्रगती होत आहे. वाढवण बंदर जगातील पाचव्या क्रमांकाचे असल्याने पालघर जिल्ह्यासह देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचे ठरणार असल्याचा दावा जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेश वाघ यांनी यावेळी बोलताना केला. बंदर थेट समुद्रातच तयार केले जाणार असल्याने कोणत्याही खासगी जागेचे भूसंपादन केले जाणार नाही. सीआरझेड १ ए चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊनच बंदराची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी दमण येथून वाळू आणून समुद्रात भराव टाकण्यात येणार असून बंदरासाठी भूसंपादन केले जाणार नाही. बंदराशी जोडणार्या रेल्वे आणि रस्त्यांसाठीच भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी योग्य तो मोबदलाही दिला जाणार आहे. बंदरामुळे पूर येणार नाही. पर्यावरणाला कोणतीही हानी पोचणार नाही, असा दावा संजय सेठी यांनी यावेळी केला.
पर्यावरण आणि विकासाची सांगड घालूनच बंदर उभारणीचे काम केले जाणार आहे. भूसंपादन केल्यानंतर योग्य मोबदला, बाधित मच्छीमारांना योग्य मोबदला दिला जाणार आहे. बंदरामुळे स्थानिक डायमेकिंग व्यवसाय जागतिक पातळीवर पोहोचल्याने त्यांच्यासाठी जागतिक मार्केटचा दरवाजा खुला होणार असल्याने या व्यवसायाला चालना मिळेल. बंदरामुळे स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असाही दावा सेठी यांनी केला आहे.