भाईंदर : मीरा -भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरातील पडीक बेवारस वाहनांवर कारवाईच्या नोटिसा लावून ४८ तासांची मुदत देत कारवाई करण्यात येणार होती. मात्र पालिकेने तो अवधी उलटला तरीही पडीक बेवारस वाहनांवर कारवाई केलेली नाही. यामुळे गाडी मालकांनी पालिकेच्या नोटीसीला केराची टोपली दाखवत रस्ता अडवून वाहने तशीच उभी केली आहेत. यामुळे पालिकेची नोटीसची दिखाव्याच्या कारवाई पुरतीच दिसून येत आहे.
भाईंदर पश्चिमेच्या रेल्वे स्टेशन रोड बालाजीनगरमधील युनियन बँक समोर असलेली बेवारस वाहने उचलून न्यावीत अशी नोटीस ३ जानेवारी रोजी लावली होती. मात्र , सद्यस्थितीत बेवारस वाहने पालिका मुख्यालयाजवळ तसेच भाईंदर पूर्वेच्या सुभाष नगर, इंद्रलोक, रामदेव पार्क व कनकिया यांसारख्या अनेक परिसरांत धूळ खात पडून आहेत. मीरा- भाईंदर शहरातील रस्ते, पदपथ, उद्यान आदी सार्वजनिक जागांवर अनेक वाहने भंगार अवस्थेत, नादुरुस्त, धूळखात पडून असतात. या वाहनांमुळे रहदारी व वाहतुकीला अडथळा होतो. यामुळे पालिका त्यांची हकालपट्टी करते. मात्र ही वाहने गोडाऊन बाहेरच रस्त्यावर वाटेल तशी ठेवल्याने दैनंदिन साफसफाई देखील पालिका कामगारांना करता येत नाही. परिणामी तेथे अस्वच्छता कायम राहते.
पालिकेकडून ठोस कारवाई नाही
पडीक – बेवारस वाहनांवर नोटीस लावण्यात येते. ४८ तासांत वाहन घेऊन जा, अन्यथा पालिका वाहन टोईंग करून नेणार आहे, असा इशारा देत नोटीस प्रसिद्ध करण्यात येते. पालिकेने जप्त केलेली वाहने ८ दिवसात संबंधित मालकाने वाहन सोडवली तर दुचाकी वाहनसाठी १२०० रु. व चारचाकीसाठी ३००० हजार रुपये दंड भरावा लागतो. ८ दिवसांनंतर देखील वाहन सोडवले नाही, तर प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची नोंदणी रद्द करून त्याचा ई लिलाव केला जातो. मात्र आजवर पालिकेकडून अशाप्रकारची कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.