अभियान स्वच्छ सुंदर बोईसर, गटारांत कचरा ढीगभर

कचर्‍यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक आणि शिल्लक खाद्यपदार्थाचा समावेश असल्याने गटारे तुंबून त्यातील सांडपाणी बाहेर रस्त्यावर येत आहे.

बोईसर : बोईसर शहराच्या दुकानांमधील कचरा थेट समोरील गटारात फेकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.या फेकलेल्या कचर्‍यामुळे गटारे तुंबून त्यातील सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ हे अभियान संपूर्ण देशात सुरू असताना बोईसर ग्रामपंचायतीचे मात्र या अभियानाकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे.शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग तयार झाले असून ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांकडून तीन-चार दिवस हा कचरा उचलला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रण मिळत आहेत.शहरातील भीम नगर, धनानी नगर,दांडीपाडा,काटकर पाडा,गणेश नगर,भैय्यापाडा,रावते पाडा,भंडारवाडा आणि शिगाव रोड सारख्या झोपडपट्टी परिसरात कचर्‍याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.त्याचबरोबर स्टेशन रोड,तारापूर रोड आणि ओसवाल एंपायरच्या अरीहंत मार्केटसारख्या उच्चभ्रू परिसरातील काही दुकानदार आणि फेरीवाल्यांकडून देखील रोजचा जमा होणारा कचरा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत न टाकता थेट समोरील आणि आजूबाजूच्या गटारांमध्ये फेकण्यात येतो. कचर्‍यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक आणि शिल्लक खाद्यपदार्थाचा समावेश असल्याने गटारे तुंबून त्यातील सांडपाणी बाहेर रस्त्यावर येत आहे.

ओसवाल परिसर आणि तारापूर रस्त्यावरील दुकानदार आणि फेरीवाले यांना त्यांच्याकडे रोजच्या जमा होणार्‍या कचर्‍याचे वर्गीकरण करून तो कचरा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत टाकण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.या सुचनांचे पालन करण्यास कुचराई करणार्‍यांवर यापुढे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

कमलेश संखे,ग्रामविकास अधिकारी
– ग्रामपंचायत बोईसर