भाईंदर :- मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमधून फरार आरोपीला नवघर पोलीस आणि सर जे.जे. मार्ग पोलिसांच्या पथकाने अवघ्या 4 तासांत पकडण्यात यश मिळवले आहे. मुंबई पोलिसांच्या सर जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हयातील आरोपी विवेक तोरडे (वय २६ वर्षे) हा तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायबंदी आहे. हा आरोपी जे. जे हॉस्पीटल मुंबई येथे दवाउपचार चालू असताना पोलीस रखवालीतून फरार झाला होता. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कलीम शेख यांनी नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांना माहिती दिली होती. आरोपी हा मालमत्तेच्या गुन्हयांमधील सराईत आरोपी असल्याने तसेच तो नवघर पोलीस ठाणे हद्दीतील इंदिरानगर झोपडपटटी, भाईंदर येथे राहावयास असल्याने त्याचा शोध घेतला जात होता.
अखेर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप पालवे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे आणि त्यांच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा इंदिरानगर झोपडपट्टी येथील स्मशान भूमी येथे मिळून आला. सदरची कामगिरी ही परिमंडळ – १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त नवघर विभाग महेश तरडे यांचा मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, सहायक पोलीस निरीक्षक संदिप पालवे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार पाटील, भुषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, ओंकार यादव, पोलीस अंमलदार सुरजसिंग घुनावत, विनोद जाधव तसेच जेजे मार्ग पोलीस ठाण्याचे पो. हवा. प्रितेश शिंदे, पोलीस अंमलदार संदिप भेरे यांनी केलेली आहे.